भुवनेश्वर; वृत्तसंस्था : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण तसेच ओडिशा भूवैज्ञानिक संचालनालयाच्या सर्व्हेअंती देवगड, क्योंझर आणि मयूरभंज जिल्ह्यांत जमिनीखाली मोठ्या प्रमाणावर सोन्याची भांडारे दडलेली असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. याआधी काश्मिरात बॅटरी उत्पादनातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या लिथियम या मूल्यवान खनिजाचे मोठे साठे आढळलेले आहेत. देशासाठी यानंतरची ही दुसरी खुशखबर आहे.
ओडिशाचे पोलाद आणि खाणकाममंत्री प्रफुल्ल मलिक यांनी ओडिशातील सुवर्णभांडारांबाबतची माहिती सोमवारी विधानसभेत दिली. तीन जिल्ह्यांत अनेक ठिकाणी सोन्याच्या खाणी आढळून आल्याचे मलिक यांनी सांगितले. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या पुढाकारातून गेल्या दोन वर्षांत या तीन जिल्ह्यांतील अनेक ठिकाणांवर दुसर्यांदा सर्वेक्षण करण्यात आले होते.
पहिल्या सर्वेक्षणाअंती समोर आलेल्या निष्कर्षांची पुनर्पडताळणी या नव्या सर्वेक्षणातून करण्यात आली होती. याआधी 1970-80 च्या दशकात पहिले सर्वेक्षण करण्यात आले होते; पण त्याबद्दलची माहिती सार्वजनिक करण्यात आली नव्हती. विस्तृत आणि व्यापक संशोधनाअंती आता हे निष्कर्ष अधिकृतपणे जाहीर करत आहोत, असेही मलिक म्हणाले. खाणींतील सोन्याचे प्रमाण किती वगैरे तपशिलाबाबत विचारणा केली असता, वाट बघा, एवढेच उत्तर त्यांनी दिले.