नवी दिल्ली; वृत्तसंस्था : 'एनडीए'कडून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे देशाच्या उपराष्ट्रपतिपदासाठी होणार्या निवडणुकीचे उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी सायंकाळी केली.
भाजप संसदीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. याआधी 6 जुलै रोजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपुष्टात येणार होता. त्यामुळे नक्वींनाच उपराष्ट्रपतिपदाची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र जगदीप धनखड यांना उमेदवारी जाहीर करून भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरले आहे.