नवी दिल्ली वृत्तसंस्था: नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) तीन दिवस कसून चौकशी करण्यात आली. यात ते सहकार्यही करीत आहेत. मात्र, द असोसिएट जर्नलला यंग इंडियाकडून दिलेल्या 50 लाखांसंदर्भातील प्रश्नावर राहुल यांनी उत्तर देऊनही ईडीचे अद्याप समाधान झालेले नाही. त्यामुळेच वारंवार तासंतास त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने आता त्यांना शुक्रवारी पुन्हा त्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. यंग इंडियाने ५० लाख देत एजेएलचे अधिग्रहण केले होते. त्यात तुमची काय भूमिका होती, या अनुषंगाने ईडीने बुधवारच्या चौकशीत प्रश्न उपस्थित केले होेते. सूत्रांनी सांगितल्यानुसार, आपल्या उत्तरात राहुल यांनी दिवंगत मोतीलाल वोरा यांचा उल्लेख करीत सर्व काम ते पाहत होते, असे सांगितले. अधिग्रहणाच्या प्रक्रियेत संचालक या नात्याने अनेक ठिकाणी स्वाक्षर्यांची गरज पडते. त्यामुळे या व्यवहाराची यंग इंडियाच्या संचालकांना कल्पना नव्हती, असे सांगितले. यावर ईडीला विश्वास नाही.
दुसरीकडे मंगळवारी झालेल्या चौकशीत राहुल यांनी यंग इंडियाच्या एकाही बैठकीत उपस्थित नव्हतो, असे सांगितले होते, तर सोमवारच्या चौकशीत ईडीने यंग इंडियाच्या संपत्तीत झालेल्या वृद्धीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, या कंपनीत वोरा आणि ऑस्कर फर्नांडिस समभागधारक होते. दोघेही आता हयात नाहीत. अशात ईडीने त्यांनी यापूर्वी चौकशीत दिलेली उत्तरे धुंडाळावीत. सर्व कामकाज वोरा हेच पाहत होते, याची खात्री पटली, तरी राहुल यांना या प्रकरणात दिलासा मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.