राष्ट्रीय

खलिस्तानवादी अमृतपाल सिंग चक्क दिल्लीत दिसला

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पंजाब पोलिसांना हवा असलेला खलिस्तानवादी अमृतपाल सिंग दिल्लीत दिसल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा हादरली आहे. दरम्यान, तो नेपाळमार्गे भारताबाहेर निसटून जाण्याची शक्यता असल्याने सीमेवर त्याची छायाचित्रे असलेली पोस्टर्स लावण्यात आली आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून अमृतपालच्या शोधासाठी पंजाबचे पोलिस जंगजंग पछाडत आहेत. त्यांना गुंगारा देऊन तो आता पंजाबबाहेर निसटला आहे. दोनच दिवसांपूर्वी तो हरियाणात कुरुक्षेत्र येथे येऊन गेल्याचे समोर आल्यानंतर अमृतपालचा शोध आता राज्याबाहेर गेल्याने पंजाब पोलिस वैतागले आहेत. त्याचा शोध सुरू असतानाच तो दिल्लीच्या काश्मिरी गेट भागात आयएसबीटी चौकात दिसल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी हाती घेण्यात आली आहे.

नेपाळकडे जाण्याची शक्यता

अमृतपाल देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती हाती आली असून, तो नेपाळमार्गे निसटण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी नेपाळमधील 'आयएसआय'चे एजंट या कामात गुंतल्याची माहिती आहे. त्यामुळे दिल्ली ते उत्तर प्रदेशचा नेपाळ सीमेवरचा भाग येथे पोलिस व सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. सशस्त्र सीमा बलाने सीमावर्ती भागात गावागावांत अमृतपालची पोस्टर्स लावली असून, त्याची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

पंजाबच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालने खलिस्तानच्या नोटाही छापल्या होत्या. अमेरिकी डॉलरसारखे डिझाईन असलेल्या या नोटांवर खलिस्तानचा नकाशाही आहे. याशिवाय त्याने खलिस्तानचा अधिकृत नकाशा या नावाने एक मोठी चित्र फाईल तयार केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT