नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा
दिल्लीतील जहांगीरपुरीत घडलेल्या धार्मिक हिंसाचारप्रकरणी आता 'ईडी'ने तपास सुरू केला आहे. 'ईडी'ने याप्रकरणात मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपी अन्सार विरोधात तपास करण्यासाठी 'ईडी'ला पत्र पाठल्यानंतर हा तपास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जहांगीरपुरी परिसरात 16 एप्रिल रोजी हनुमान जयंतीला धार्मिक दंगल उसळली होती.
अन्सारसह इतर आरोपींविरोधातही 'ईडी' आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वे (पीएमएलए) तपास करणार आहे. दिल्ली पोलिसांकडून अन्सार तसेच जहांगीरपुरी हिंसाचारात त्यांच्या भूमिकेसंबंधी कागदपत्रे 'ईडी'कडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे पीएमएलए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्सार तसेच इतरांना कुठल्या संघटनेकडून अथवा व्यक्तीकडून पैसा पुरवण्यात आले का? याचा वापर हिंसाचारासाठी करण्यात आला का? याअनुषंगाने 'ईडी' तपास करणार आहे. शिवाय 'ईडी'च्या अधिकार्यांकडून अन्सार तसेच इतर आरोपींची बँक तसेच मालमत्तेची देखील माहिती गोळा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मोहम्मद अन्सारने हिंसाचाराचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.