राष्ट्रीय

अदानी समूहाने दिले राहुल गांधींच्या आरोपाला उत्तर, “कंपन्यांचे शेअर…”

सोनाली जाधव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था; शेल (बोगस कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणुकीचा हिंडेनबर्गचा आरोप अदानी समूहाने आधीच फेटाळून लावला होता. हिंडेनबर्ग अहवालाच्या आधारेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कशा पद्धतीने करण्यात झाली, या प्रश्नालाही अदानी समूहाने सोमवारी उत्तर दिले.

अदानी समूहात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक शेल कंपन्यांच्या माध्यमातून झाली आहे, असा राहुल गांधी यांचा आरोप होता. त्याला उत्तर देताना, २०१९ पासून आजअखेर समूहांतर्गत कंपन्यांनी आपला शेअर विकून २.८७ अब्ज डॉलर (जवळपास २० हजार कोटी रुपये) एवढी रक्कम उभारली होती. यातील २.५५ अब्ज डॉलर पुन्हा व्यवसायात गुंतविलेही होते.

अबूधाबीत गुंतवणूक

अबूधाबीतील ग्लोबल स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट कंपनी, इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी पीजेएससीने (आयएचसी) अदानी समूहातील अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड आणि अदानी एनर्जी लिमिटेड (एजीईएल) या कंपन्यांमध्ये २.५९३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. यादरम्यान गुंतवणूकदारांनी अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि एजीईएलने २.७८३ अब्ज डॉलर जमविण्यासाठी आपले शेअर विकले होते. यातून जी रक्कम आली, ती पुन्हा समूहाच्याच अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड, अदानी पोर्टर्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पॉवर लिमिटेडमध्ये गुंतविण्यात आली होती, असेही अदानी समूहाने स्पष्ट केले आहे.

अहवाल हटविण्याची मागणी

हिंडेनबर्गने केवळ स्वार्थापोटी अदानी समूहाबद्दल अहवाल प्रसिद्ध केला होता. संकेत स्थळावरून तो हटविण्यात यावा, अशी मागणीही अदानी समूहाने केली आहे.

अदानींचे उत्तर दृष्टिक्षेपात

• प्रवर्तकांनी २०२१ मध्ये अदानी ग्रीन एनर्जीचे २० टक्के शेअर टोटल एनर्जीला विकले. यातून दोन अब्ज डॉलर मिळाले.
तत्पूर्वी प्रवर्तकांनी टोटल एनर्जीला अदानी टोटल गॅसचे ३७.४ टक्के शेअर विकून ७८३ दशलक्ष डॉलरचा निधी उभारला.
● टोटल एनर्जीने गुंतवणुकीसाठी प्रवर्तकांच्या विदेशी गुंतवणूक संस्थांची खरेदी केली.
● परदेशातून प्राप्त झालेला हाच निधी समूहाच्या कंपन्यांतून गुंतविला. काही लोक यालाच शेल कंपन्यांतून आलेला पैसा म्हणत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT