पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्यावरून हिंसाचार उसळला आहे. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. हिंसक निदर्शनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बरहमपूर मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणच्या एका पोस्टमुळे वाद आणखी पेटला आहे. सोशल मीडियावर त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे.
युसूफ पठाणने दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तो आरामात चहाचा आस्वाद घेताना दिसत आहे. मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या दरम्यान केलेल्या या पोस्टने त्याला ट्रोल केले जात आहे. कारण, हिंसाचारग्रस्त भाग पठाण याच्या मतदारसंघाच्या जवळचा आहे. त्याच्या पोस्टवरून सोशल मीडियावर ट्रोलचा भडिमार होत आहे.
पठाणने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आरामदायी दुपार, छान चहा आणि शांत वातावरण. फक्त क्षणाचा आनंद घेत आहे." त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. तुम्हाला काही लाज आहे का? असा संतप्त सवालच एका वापरकर्त्याने विचारला आहे. भाजपने देखील पठाणवर जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जी सरकारवर राज्य पुरस्कृत हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोपही भाजपने केला आहे. 'बंगाल जळत आहे. ममता बॅनर्जी राज्य-संरक्षित हिंसाचाराला प्रोत्साहन देतात, तर पोलीस गप्प आहेत. खासदार युसूफ पठाण चहा पितात. ही तृणमूल काँग्रेस आहे,' अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली आहे.