'या' मुस्लिम आमदाराने मंदिर आणि वैदिक शिक्षणासाठी उठवला आवाज file photo
राष्ट्रीय

'या' मुस्लिम आमदाराने मंदिर आणि वैदिक शिक्षणासाठी उठवला आवाज

Yunus Khan | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले ७ प्रश्न

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय राज्यघटनेने सर्व धर्मांना समान अधिकार दिले आहेत, पण तरीही देशात धार्मिक राजकारण अधिक तीव्र आहे. काही वेळा धार्मिक भावना भडकवून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी लोकांना धर्मनिरपेक्ष विचार शिकवणे आवश्यक आहे. सध्या अशाच एका राजस्थानच्या मुस्लिम आमदाराची मोठी चर्चा आहे. कारण म्हणजे, मंदिरांच्या विकासासाठी आणि वैदिक शिक्षणासाठी ते करत असलेले प्रयत्न.

राजस्थानच्या विधानसभा अधिवेशनात मंदिरांच्या सुधारणा आणि वैदिक शिक्षणासाठी अनेकदा आवाज उठवणाऱ्या या आमदारांचे नाव आहे युनुस खान. पूर्वी भाजपचे नेते असलेले खान सध्या डीडवाना मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. राजस्थानमध्ये ३१ जानेवारीपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात युनुस खान यांनी मंदिरांच्या देखभालीसाठी आणि वैदिक शिक्षणाला चालना देण्यासाठी अनेक वेळा आवाज उठवला. इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार, माजी परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या युनुस खान यांनी या अधिवेशनात मंदिरांची सुधारणा आणि वैदिक शिक्षण यांसंदर्भात ७ प्रश्न विचारले.

कोण आहेत आमदार युनुस खान?

युनुस खान हे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते दोन वेळा राजस्थानचे कॅबिनेट मंत्री होते. तीन वेळा आमदार राहिले आहेत. २०२३ मध्ये भाजपने त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि डीडवाना मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या चेतनसिंग चौधरी यांचा पराभव केला. युनुस खान यांची सर्व समाजांमध्ये मजबूत पकड आहे. ते केवळ मुसलमानांमध्येच नव्हे, तर हिंदूंमध्येही लोकप्रिय आमदार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून केलेल्या कामाचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी वैदिक शिक्षकांच्या मानधनात आणि पुजार्‍यांना मिळणाऱ्या सन्मान निधीत झालेल्या वाढीचे श्रेय स्वतः घेतले. त्यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर सरकारने त्या निधीत वाढ केली, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT