influencer madhumitha burglary आजकाल आपल्या जवळच्या वस्तूंचे प्रदर्शन करुन रिल बनवण्याचा नवीनच फंडा सुरु झाला आहे. काहीजण आपल्याजवळ किती पैसा, गाड्या बंगले याचे समाजासमोर प्रदर्शन मांडत असतात. प्रसिद्धीचा हव्यास व पैशाचा माज दाखवण्याची चढाओढच काही इन्स्टा रिल्सवर चाललेली असते. यातूनच एक चांगलीच धक्कादायक घटना तामिळनाडूतून समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथील एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला सोशल मीडियावर आपली संपत्ती आणि सोन्या-दागिन्यांचे प्रदर्शन करणे महागात पडले आहे. नागरकोइल येथील तिच्या घरातून तब्बल १ कोटी रुपयांचे सोन्या-हिऱ्याचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लांबवली आहे.
पैसे उधळत, सोन्याचे दागिने मिरवत केले रिल्स
मधुमिता असे या इन्सा इन्लुअन्सरचे नाव असून तीने आपल्या रिलमध्ये आपल्याकडे असलेले पैसे उधळत तसेच दागिने घालून मिरवत रिल तयार करत असते. या रिलमध्ये ती तिची मुलगी व तिचा पती दिसत आहे. ती पाचशेच्या नोटा उधळताना दिसत आहे. तसेच दागिने घालून मिरवत असते, आपल्याकडे किती पैसा आहे हे दाखवताना चोरट्यांनी मात्र चोरी कशी करायची हे बरोबर हेरले.
खरेदीसाठी बाहेर पडले व चोरट्यांनी साधला डाव
नागरकोइल येथील 'व्हीआयपी गार्डन' येथे मुधूमिता हिचे घर आहे हे लोकेशन चोरट्यांनी शोधून काढले. गुरुवारी इन्फ्लुएन्सर मधूमिता हिचे कुटुंब खरेदीसाठी बाहेर गेले होते. घराला कुलूप असल्याचे पाहून संधी साधत चोरांनी मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि लॉकरमधील ऐवज चोरून नेला. घरी परतल्यानंतर कुटुंबीयांना चोरी झाल्याचे लक्षात आले. यामध्ये सुमारे अंदाजे ९६० ग्रॅम सोने, हिऱ्याचे दागिने आणि ५०,००० रुपयांची रोकड. अशी सुमारे १ कोटी रुपयांची चोरी झाली आहे. ही घटना आता सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे.
साडेचार लाख फॉलोअर्स
मधूमिता ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असून इन्स्टाग्राम व इतर प्लॅटफॉर्म्सवर तिचे ४.५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच रील्स आणि फोटोंमधून तिची लाइफस्टाइल, सोन्याचे दागिने आणि कपाटातील नोटांचे बंडल लोकांसमोर दाखवत असे. एका जुन्या रीलमध्ये तिने आपली मौल्यवान संपत्ती कशी सुरक्षित ठेवायची हे मला माहीत आहे, असा दावाही केला होता; परंतु चोरांनी तिच्या घरावरच डल्ला मारत हा दावा खोटा ठरवला.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध घेण्यासाठी ५ विशेष पथके तयार केली आहेत. पोलीस आता मधूमिताच्या जुन्या आणि नवीन रील्सची कसून चौकशी करत आहेत. तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये तिने नकळतपणे आपल्या घराची माहिती किंवा लोकेशन उघड केले होते का, याचा तपास सुरू आहे. सायबर विश्वात स्वतःची खासगी माहिती आणि मौल्यवान वस्तूंचे भरमसाठ प्रदर्शन करणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे ताजे उदाहरण मानले जात आहे.
दरम्यान या घटनेवर अनेकांनी चोरट्यांनाच सपोर्ट केल्याचे दिसत आहे. अनेकांनी या घटनेच्या व्हिडीओवर कमेंट करताना अशीच अद्दल घडली पाहिजे, लक्ष्मीचा अपमान करणाऱ्यांना मिळालेली शिक्षा अशा कमेंट येत आहेत.