Jyoti Malhotra Instagram
दिल्ली : युट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या चर्चेत आहे, याचे कारण म्हणजे तिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप. ज्योती यूट्यूबवर 'ट्रॅव्हल विथ जो' या नावाने प्रसिद्ध आहे. सध्या तिला पाकिस्तानसाठी गुप्त हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरू आहे. दरम्यान, ज्योतीच्या सोशल मीडिया खात्यांबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
ज्योती मल्होत्रा हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील रहिवासी आणि एक प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तिचे युट्यूबवर ३७ लाखांहून अधिक सबस्क्राइबर आहेत. तिला प्रवासाची आवड आहे आणि ती त्याचे व्हिडिओ देखील अपलोड करते. तिचे पाकिस्तान, चीन आणि इंडोनेशियामध्ये नेटवर्क असल्याचे तपासातून पुढे आले आहे. आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याचा तिच्यावर संशय आहे. अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमधील पहलगामलाही तिने भेट दिली होती. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांकडून तिची कसून चौकशी सुरू आहे. ज्योतीवर हेरगिरीचा आरोप झाल्यापासून, अनेक लोक तिचा शोध घेत आहेत. दरम्यान, तिचे इंस्टाग्राम अकाउंट निलंबित करण्यात आल्याचे दिसून आले आहे. यूट्यूब चॅनल चालवणार्या ज्योतीच्या चॅनलवर ३.७७ लाख सबस्क्राईबर्स आहेत. मात्र, अद्याप YouTube चॅनेलवर काहीही झालेले नाही. खरंतर, स्वातंत्र्यापूर्वी ज्योतीचे कुटुंब पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये राहत होते, पण स्वातंत्र्यानंतर सर्वजण भारतात आले.
ज्योती भारतातील मनाली, मसुरी, जैसलमेर, जयपूर आणि काश्मीर अशा पर्यटन स्थळांवर ब्लॉग करून प्रसिद्ध झाली होती. तिने ट्रॅव्हल विथ जो नावाचं यूट्यूब चॅनल चालवलं आणि हळूहळू ती एक सोशल मीडिया सेलीब्रिटी झाली. यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीने पाकिस्तान दौर्यादरम्यान पाकिस्तान उच्चायुक्ताच्या पार्टीत हजेरी लावली होती. तिथे ती इतर भारतीय ब्लॉगरसोबत होती. तिथूनच तिच्या कथित गुप्त हेरगिरीच्या कथेला सुरुवात झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योतीच्या पाकिस्तान दौर्याचा पूर्ण खर्च दानिश नावाच्या व्यक्तीने उचलला होता. तपास एजन्सी या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करत आहेत. दानिश हा पाकमधील उच्चायुक्तालयातील नोकर असून तो आयएसआयसाठी काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या सकारात्मक प्रतिमेचा प्रचार करण्यासाठी परदेशी एजंटांनी तिची निवड केली. त्यानंतर तिने त्या देशात काही व्यक्तींसोबत संपर्क साधला, जे भारताच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकतात.
ज्योती तीन वेळा पाकिस्तान दौर्यावर गेली होती आणि चौथ्यांदा जाण्याची तयारी करत होती, अशी माहिती समोर आली आहे. तिच्या यूट्यूब चॅनलवर पाकिस्तानातील विविध ठिकाणांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात आढळतात. पोलिस तपासात ही बाबही महत्त्वाची ठरत आहे. ज्योतीचा पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी, मरियम नवाज हिच्याशी थेट संपर्क होता. तिने मरियम नवाजची मुलाखत घेतली होती आणि तो व्हिडीओ ७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला होता. ज्योतीने स्वतः सांगितले होते की, ती दुसर्यांदा पाकिस्तानला गेली होती. विशेष म्हणजे ती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तात काम करणार्या पाकिस्तानी अधिकार्याशी संपर्कात होती.