Youth Congress Protest 
राष्ट्रीय

Youth Congress Protest : जंतर-मंतर खुले करण्यासाठी युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : शांततापूर्ण आंदोलनांसाठी जंतर-मंतर पुन्हा खुले करावे, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी भारतीय युवक काँग्रेसने रविवारी (४ ऑक्टोबर) राजधानीत मशाल मोर्चा काढला. रायसीना रोडवरील युवक काँग्रेसच्या कार्यालयापासून जंतर-मंतरच्या दिशेने हा मोर्चा काढण्यात आला. हातात मशाली, फलक आणि तिरंगा घेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

‘जंतर-मंतर वापस लाओ’ या अभियानांतर्गत हा मोर्चा काढण्यात आल्याचे युवक काँग्रेसने सांगितले. जंतर-मंतरवर बॅरिकेडिंग, आंदोलनांवरील निर्बंध आणि निदर्शनांना परवानगी नाकारली जात असल्याने शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावर परिणाम होत असल्याचा आरोप संघटनेने केला. प्रस्तावित आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिल्याचेही युवक काँग्रेसने म्हटले आहे.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब यांनी जंतर-मंतर हे नागरिकांना लोकशाही मार्गाने विरोध नोंदविण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण असल्याचे सांगितले. ते पुन्हा आंदोलनांसाठी खुले करण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार याद्यांबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, मोर्चेकरी जंतर-मंतरच्या दिशेने जात असताना दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड लावून त्यांना रोखले. त्यानंतर चिब यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलन शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने सुरू ठेवण्याचा निर्धार युवक काँग्रेसने व्यक्त केला.

नेहा बोरा यांच्या आंदोलनाचीही चर्चा

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आयसा) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांच्या नेतृत्वाखालीही गेल्या तीन दिवसांपासून जंतर-मंतरकडे मोर्चे काढले जात आहेत. पोलिसांनी आंदोलकांना बॅरिकेडवर रोखल्यानंतर बोरा यांच्यासह अनेकांना ताब्यात घेण्यात आले. रविवारीही आयसाच्या कार्यकर्त्यांनी अशोक रोडवरील आंध्र भवन सर्कलपासून जंतर-मंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोरा यांना पोलिसांनी एका वाहनातून अज्ञात ठिकाणी नेल्याचा दावा आयसा कार्यकर्त्यांनी केला. वाहनावर अधिकृत क्रमांकाची पाटी नव्हती आणि वाहनात महिला पोलिस अधिकारीही नव्हती, असा आरोप संघटनेने केला. दरम्यान, २ आणि ३ ऑक्टोबरच्या आंदोलनांमध्येही बोरा यांच्यासह अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जंतर-मंतरकडे जाणाऱ्या आंदोलकांना परवानगी नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT