मंदसौर : मध्य प्रदेशातील खानपुरा परिसरात गरब्याचा सराव करत असलेल्या एका तरुणीचे भर गर्दीतून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रेम विवाहाला विरोध असल्याने कुटुंबीयांनीच दोन महिला आणि चार तरुणांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे उघड झाले.
आरोपींनी तरुणीला फरफटत नेले, तर विरोध करणार्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही तासांतच तरुणीची सुटका केली असून, याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. शनिवारी रात्री खानपुरा भागातील भावसार धर्मशाळेत महिला आणि तरुणी गरब्याचा सराव करत होत्या. त्याचवेळी दोन महिला आणि चार तरुण तेथे पोहोचले आणि त्यांनी एका तरुणीला जबरदस्तीने पकडले. तरुणीने जाण्यास नकार दिल्याने आरोपी तिला फरफटत गाडीकडे घेऊन जाऊ लागले. हा प्रकार पाहून उपस्थितांमध्ये घबराट पसरली. उपस्थित महिलांपैकी एका तरुणीने तिला वाचवण्यासाठी धाव घेतली, मात्र आरोपींनी तिला ढकलून दिले. एका आरोपीच्या हातात गावठी पिस्तूल असल्याने कोणीही पुढे येण्याचे धाडस केले नाही.