बारीपाडा (ओडिशा) : नोकरीचे आमिष दाखवून एका 21 वर्षीय तरुणीवर चालत्या प्रवासी व्हॅनमध्ये सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना उडाला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज्य महामार्गावर घडली असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींपैकी दोघे तिच्या ओळखीचे होते. त्यांनी तिला एका खासगी कंपनीत नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून पीडिता त्यांच्यासोबत गेली असता आरोपींनी तिला गाडीत बसवून उडाला-बालासोर रस्त्यावर तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि तेथून पळ काढला.
याप्रकरणी उडाला पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, इतर चार फरारी आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.