राष्ट्रीय

तामिळनाडूत सत्तापालट करणा-या ‘स्टॅलिन’ यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Pudhari News

चेन्नई : पुढारी ऑनलाईन 

तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने डीएमकेच्या बाजूने कल दिला आहे. एम के स्टेलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमकेने मोठे यश मिळवले असून बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असणा-या अण्णाद्रमुकला विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. 

तामिळनाडूतील डीएमकेच्या विजयाबरोबर राज्याला एम. के. स्टॅलिन यांच्या रूपात नवे राजकीय नेतृत्व मिळाल्याची चर्चा आहे. 

कोण आहेत स्टॅलिन? : जाणून घ्या त्यांच्याबद्दलची रंजक माहिती…

द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे विद्यमान अध्यक्ष मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन ऊर्फ एम. के. स्टॅलिन यांचा जन्म १ मार्च १९५३ रोजी झाला. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे ते तिसरे अपत्य. स्टॅलिन हे नाव रशियाचे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते जोसेफ स्टॅलिन यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. स्टॅलिन यांनी चेन्‍नईमधील के. नंदनम ऑर्टस् कॉलेजमधून इतिहास विषयातून पदवी मिळवली आहे. २००६ मध्ये ते तामिळनाडू सरकारमध्ये ग्रामीण विकास आणि स्थानिक प्रशासनमंत्री बनले. २९ मे २००९ रोजी स्टॅलिन यांना राज्यपाल सुरजितसिंग बरनाला यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. त्यांचे सावत्र भाऊ एम. के. अझगिरी हेसुद्धा राज्यामध्ये मंत्री होते, तर त्यांची सावत्र बहीण कनिमोझी या राज्यसभेत खासदार आहेत.

– स्टॅलिन यांचे राजकीय जीवन १४ व्या वर्षी सुरू झाले. १९६७ साली ते पहिल्यांदा प्रचारात उतरले. १९७३ मध्ये स्टॅलिन यांना द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) च्या कार्यकारिणीमध्ये नियुक्‍त करण्यात आले.

– १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात स्टॅलिन यांना 'मिसा'खाली तुरुंगवास झाला होता. १९८९ साली चेन्‍नईच्या थाऊजंड लाईटस् मतदारसंघातून विधानसभेवर ते पहिल्यांदा निवडून गेले. त्यानंतर 4 वेळा त्यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले. १९९६ मध्ये स्टॅलिन हे चेन्‍नईचे लोकनियुक्‍त महापौर बनले होते.

– २०१६ मध्ये स्टॅलिन हे पुन्हा एकदा महापौर बनले; पण तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी कायदेशीर डावपेच खेळून स्टॅलिन यांना पदच्युत केले. 

– स्टॅलिन यांनी २००९ साली डीएमके आणि यूपीए युतीला सत्तेत आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

सिनेजगतातही आजमावले नशीब

दाक्षिणात्य परंपरेला जागून स्टॅलिन यांनी चित्रपट क्षेत्रातही आपले नशीब आजमावले. १९८० च्या दशकात त्यांनी काही तमिळ सिनेमांत काम केले. १९९० च्या दशकात सन टी.व्ही.वरील काही मालिकांमधूनही त्यांनी काम केले आहे.

वैयक्‍तिक माहिती

नाव : मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन

जन्म : १ मार्च १९५३ (वय ६८)

जन्म ठिकाण : चेन्‍नई (मद्रास)

पत्नीचे नाव : दुर्गा स्टॅलिन

वडील : एम. करुणानिधी

आई : दयालू आमला

भाऊ : एम. के. अझगिरी, एम. के. तमिलारासू, बहीण : एम. के. सेल्वी,

सावत्र भाऊ : एम. के. मुथू, सावत्र बहीण : कनिमोझी

मुले : उदयनिधी स्टॅलिन

मुलगी : सेन्थामराई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT