पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी.  File photo
राष्ट्रीय

'तुम्ही संवेदनशील विषयाकडे लक्ष दिले नाही' : ममता बॅनर्जींचा पीएम मोदींना सवाल

आठवडाभरात ममता बॅनर्जींचे पंतप्रधानांना दुसरे पत्र

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

कोलकाता येथील डॉक्टरवर बलात्कार-हत्या प्रकरणासंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना आठवडाभरात दुसरे पत्र लिहिले आहे. 'मी २२ ऑगस्टला पत्र लिहून बलात्कार करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली होती, मात्र इतक्या संवेदनशील विषयावर मला तुमच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे ममता बॅनर्जी पत्रात म्हणाल्या आहेत.'

कोलकाता येथील डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना २२ ऑगस्ट रोजी पत्र लिहिले होते. बलात्कारासारख्या घटनांमधील आणि तत्सम आरोपींसाठी कडक कायदा करण्याची मागणी केली होती. यानंतर पुन्हा आठच दिवसात दुसरे पत्र ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे. आपला दुसऱ्या पत्रात ममता बॅनर्जी म्हणल्या की, 'या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. महिला व बालविकास मंत्र्यांकडून व्हिडिओद्वारे उत्तर मिळाले. मी पुन्हा विनंती करते की केंद्र सरकारने बलात्कार आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांवर कडक कायदा करावा. विहित मुदतीत खटला संपवण्याचीही तरतूद या कायद्यात असावी,' याचा पुनरुच्चार ममता बॅनर्जी यांनी दुसऱ्या पत्रातही केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी आपल्या मागच्या पत्रात काही मागण्या केल्या होत्या. यामध्ये बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये १५ दिवसांत खटला चालवून निकाल लावावा, सध्याच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की देशात दररोज ९० बलात्काराच्या घटना घडत आहेत. यात बहुतांश घटनांमध्ये बलात्कार पीडितेचा खून होतो. या गोष्टी भयावह असून यामुळे समाजाचा आणि देशाचा आत्मविश्वास डळमळीत होतो. महिलांना सुरक्षित वाटणे हे आपले कर्तव्य आहे. असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या पहिल्या पत्राला केंद्र सरकारने उत्तर दिले होते. केंद्र सरकारमधील महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी या संदर्भातला एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यामध्ये बंगालमधील बहुतांश जलदगती न्यायालये बंद असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. बंगालमध्ये एकूण १२३ जलदगती न्यायालये सुरू करण्यात आले होते, परंतु त्यापैकी बहुतांश बंद आहेत. याशिवाय बंगालमधील पोक्सोच्या प्रलंबित प्रकरणाबाबत ममता बॅनर्जींचे सरकार कोणतीही पावले उचलत नसल्याचे अन्नपूर्णा देवी म्हणाल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT