Ram Mandir Donation Scam | दोषींना सोडणार नाही; १५ दिवस संयम ठेवा! : योगी आदित्यनाथ 
राष्ट्रीय

Ram Mandir Donation Scam | दोषींना सोडणार नाही; १५ दिवस संयम ठेवा! : योगी आदित्यनाथ

श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरण

अरुण पाटील

अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरीच्या कथित प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी अयोध्या दौरा करून या विषयावर भूमिका स्पष्ट केली. दोषी कुणीही असू दे, त्याला सोडणार नाही. भाविकांनी आणखी फक्त १५ दिवस संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले. विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुरावे ‘एसआयटी’कडे द्या

या प्रकरणाशी संबंधित कोणाकडेही पुरावे किंवा माहिती असल्यास ती थेट एसआयटीकडे द्यावी. चौकशी सुरू असताना कोणतीही बेजबाबदार विधाने करून रामभक्तांच्या भावना दुखावू नयेत. भगवान राम यांनी मर्यादा, संयम आणि शिस्तीचा संदेश दिला. राम मंदिराच्या उभारणीसाठी रामभक्तांनी जवळपास ५०० वर्षे संघर्ष केला. त्यामुळे आणखी १५ दिवस संयम बाळगा आणि चौकशी पूर्ण होऊ द्या. चौकशीदरम्यान कोणतीही व्यक्ती गैरप्रकारात सहभागी असल्याचे आढळल्यास तिच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दोषी कोणीही असो, त्याला माफी दिली जाणार नाही.

समाजवादी पक्ष, काँग्रेसवर टीका

योगी म्हणाले, राम मंदिर उभारणीला विरोध करणाऱ्या काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात भगवान राम अस्तित्वातच नसल्याचा युक्तिवाद केला होता. आता तेच अयोध्या आणि रामभक्तांचा अवमान झाल्याचा दावा करत आहेत. समाजवादी पक्षाच्या आरोपांवर योगी म्हणाले, हेच पूर्वी कारसेवक आणि रामभक्तांवर गोळीबार करण्याचे आदेश देत होते. अशा लोकांनी नैतिकतेचे धडे देणे योग्य नाही. चौकशी पूर्ण होईपर्यंत सार्वजनिक आरोप-प्रत्यारोप टाळा. त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. हा संवेदनशील विषय असल्याने जबाबदारीने वागा, असे ते म्हणाले.

रामलल्लाच्या पादुका, हार चोरीला?

प्रभू रामलल्‍लाचा हिरेजडीत हार आणि सोन्या-चांदीच्या चरण पादुकादेखील चोरीला गेल्याची शंका उपस्थित केली जात आहे. पुजाऱ्यांच्या मते, हार आणि चरण पादुका प्रभू रामलल्‍लाला परिधान केल्यानंतर ते टिन्‍नू यादव यांच्याकडे परत सुपूर्द करण्यात आले. टिन्‍नू यादवने दावा केला की, हे दागिने वितळवून सोन्याच्या विटा बनवण्याचे ठरले होते. परंतु, दागिने ठेवण्याची जबाबदारी असलेल्या कृष्ण देव तिवारी यांच्याकडे ना सोन्याची वीट सापडली, ना दागिन्यांची पावती. या गोंधळामुळे चोरीचा संशय बळावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT