लखनौ : उत्तर प्रदेशची २०२७ मधील विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल, असा पुनरुच्चार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी विनोद तावडे यांनी केला आहे. लखनौ येथे आयोजित भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. गृहमंत्री अमित शहा यांनी सातत्याने योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. सुज्ञांना हा इशारा समजायला हवा, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
लोकसभेतील ‘अब की बार ४०० पार’च्या घोषणेतील त्रुटींची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशात होणार नाही, असे तावडे म्हणाले. कार्यकर्त्यांनी २०१७ प्रमाणेच २०२७ च्या निवडणुकीत ३१२ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्त्यांच्या समस्या संवाद साधून सोडवल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उच्चवर्णीय मतदारांमधील नाराजीच्या मुद्द्यावर बोलताना तावडे म्हणाले की, भाजप मतदारांशी थेट संपर्क साधून वस्तुस्थिती समजावून सांगेल. भाजपचे सरकार आले नाही, तर राज्य पुन्हा २०१७ पूर्वीच्या स्थितीत जाईल, हे जनतेला पटवून देणे गरजेचे आहे. गुन्हेगारीवरील कारवाईचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, अतिक अहमद आणि मुख्तार अन्सारी यांसारख्या माफियांवर कठोर कारवाई करून त्यांच्या जप्त जमिनींवर गरिबांसाठी घरे बांधली जात आहेत.