अवघ्या काही तासांत वर्ष 2024 ला निरोप देत आपण नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. सरत्या वर्षात घडलेल्या अनेक घटनांमुळे हे वर्ष पुढेही स्मरणात राहणार असून, यापैकी महत्त्वाच्या घटनांचा घेतलेला आढावा...
आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एक प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे अवघा देश हादरला. कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्या या घटनेनंतर देशभरात निदर्शने झाली होती.
केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात 231 जणांना आपला जीव गमवावा लागला. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल 1200 कोटी रुपयांचे नुकसान झाले. अनेकांची कुटुंबे आणि निवारा या घटनेने हिरावला.
बंगळूरमध्ये एका व्यक्तीने त्याची प्रेयसी महालक्ष्मीची हत्या करून तिच्या शरीराचे 59 तुकडे करीत ते फ्रीजमध्ये ठेवल्याची घटना उघडकीस आली होती. अत्यंत क्रूर अशा या घटनेची देशभरात चर्चा झाली.
तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या लाडूमध्ये जनावरांची चरबीचा वापर होत असल्याच्या आरोपाने देशभरात खळबळ उडाली होती. अनेकांच्या धार्मिक भावना याने दुखावल्या गेल्या. ज्यामुळे मंदिर प्रशासन संशयाच्या फेर्यात सापडले होते.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका सत्संगाच्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी होऊन त्यात तब्बल 121 लोकांचा जीव गेला. भोले बाबाच्या पायाची धूळ घेण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडला होता.
जम्मू आणि काश्मीरातील रियासी जिल्ह्यात भाविकांच्या एका बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत 33 जण जखमी झाले होते. बसचालकाला गोळी लागल्याने बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली होती.
2024 ला आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष घोषित करण्यात आले. हवामान बदलाचे परिणाम यावर्षी स्पष्टपणे दिसून आले, देशभरात उकाड्याने अवघे जनजीवन प्रभावित केले होते.
यावर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विजय संपादित केला. घटक पक्षांच्या साथीने सरकार स्थापन करीत मोदी तिसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संसद परिसरात सुरू असलेल्या निषेध आंदोलनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले. या गोंधळात भाजपचे दोन खासदार जखमी झाले. दोन्हीकडील आरोप-प्रत्यारोपांनी शिखर गाठले होते.
वर्षातील अखेरच्या दिवसांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने अवघा देश हळहळला. देशाच्या जडणघडणीत त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करीत जगभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.