राष्ट्रीय

BRICS Summit 2026 | ताकदीच्या जोरावर अधिकार प्रस्थापित करण्याची प्रवृत्ती संपायला हवी होती : शी जिनपिंग

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : निष्पक्षता आणि न्याय ही संपूर्ण जगाची सामायिक अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय नियम सर्व देशांच्या सहभागातून बनले पाहिजेत, असे सांगत ‘ज्याची लाठी त्याची म्हैस’ही मानसिकता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रविवारी दिला. ताकदीच्या जोरावर अधिकार प्रस्थापित करण्याची प्रवृत्ती केव्हाच संपायला हवी होती, अशी भूमिका त्यांनी मांडली.

ब्रिक्स परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय व्यवस्था नियमांवर आधारित असावी यावर जिनपिंग यांनी भर दिला. नियम नसलेले जग हे ट्रॅफिक सिग्नल नसलेल्या चौकासारखी असते, तिथे केवळ अराजकता आणि अनास्थाच पसरू शकते, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायदा सर्व देशांवर समानरीत्या लागू झाला पाहिजे आणि त्यात दुजाभाव अथवा दुहेरी निकष चालणार नाहीत, असे ते म्हणाले.

जिनपिंग यांची पंचसूत्री

ब्रिक्समधील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी शी जिनपिंग यांची पंचसूत्री

१. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) : एआय क्षेत्रात ब्रिक्स ओपन सोर्स कम्युनिटी स्थापन करण्याचा प्रस्ताव, या माध्यमातून लँग्वेज मॉडेलचा विकास, विशेष प्रशिक्षणांचे आयोजन.

२. व्यापार आणि गुंतवणूक : ब्रिक्स विशेष आर्थिक क्षेत्र भागीदारीची स्थापना करणे. ही परिषद पुढील वर्षी चीनमध्ये होईल.

३. डिजिटल उद्योग : ब्रिक्स डिजिटल इकोसिस्टीम क्लाऊड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डिजिटल कौशल्य आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण.

४. स्मार्ट विनिर्माण : सदस्य देशांना स्मार्ट कारखाने उभारणीसाठी चीनकडून सर्वतोपरी मदत मिळवून देणे.

५. विज्ञान आणि तंत्रज्ञान : ‘ब्रिक्स इंजिनिअर ट्रेनिंग अलायन्स’ तयार करून अभियंत्यांच्या कौशल्याला मान्यता देणे आणि तरुणांसाठी वैज्ञानिक आदान-प्रदान कार्यक्रम सुरू करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT