पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (दि. १२) सकाळपासून चकमक सुरू असल्याचे वृत्त ANIने दिले आहे. आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.
बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांनी आश्रय घेतला असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. सुरक्षा दलाच्या पथकाने शाेध माोहिम राबवली. यावेळी नक्षलींनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गाेळीबार केला. त्यांनी सडेताेड प्रत्युत्तर दिले. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सध्या शोध मोहीम सुरू आहे.
वर्षारंभापासून छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी धडक कारवाई सुरु ठेवली आहे. ४ जानेवारी रोजी छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील दक्षिण अबुझमाड येथील जंगलात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईवर असताना ही चकमक झाली होती.
६ जानेवारी रोजी बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आयईडी वापरून त्यांचे वाहन उडवून दिल्याने जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) चे आठ कर्मचारी आणि एक चालक ठार झाला. जिल्ह्यातील बेदरे-कुत्रू रोडवर सुरक्षा पथक नक्षलविरोधी कारवाईवरून परतत असताना हा स्फोट घडवून आणला होता.