World's largest container ship MSC IRINA arrived at Vizhinjam Port karan adani welcomes
तिरुवनंतपुरम : करन अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी ग्रुपच्या विझिंजम इंटरनॅशनल सीपोर्टवर आज जगातील सर्वात मोठं कंटेनर जहाज MSC IRINA दाखल झालं आहे. या घटनेमुळे केवळ विझिंजमच नाही तर भारताचं जागतिक समुद्री वाहतूक नकाशावरील महत्वाचं स्थान अधोरेखित झालं आहे.
MSC IRINA चं विझिंजम पोर्टवर आगमन ही भारताच्या समुद्रवाहतूक क्षमतेतील एक क्रांतिकारी घटना मानली जात असून भविष्यात हे बंदर भारताला जागतिक ट्रान्सशिपमेंट हब बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
MSC IRINA हे जहाज 24,346 TEUs (Twenty-foot Equivalent Units) इतक्या कंटेनरांची वाहतूक करण्यास सक्षम आहे. ही क्षमता आजवरच्या सर्व जहाजांपेक्षा अधिक असून, हे जहाज पहिल्यांदाच दक्षिण आशियात दाखल झालं आहे. मंगळवार, 10 जूनपर्यंत हे जहाज बंदरात थांबणार आहे.
करन अदानी हे उद्योगपती गौतम अदानी यांचे पुत्र आहेत. ते भारतातील सर्वात मोठ्या बंदर आणि लॉजिस्टिक्स कंपनी, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी 2024 मध्ये या पदाची धुरा स्वीकारली, त्याआधी ते कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) होते.
त्यांनी अमेरिकेतील पर्ड्यू युनिव्हर्सिटी येथून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. याशिवाय वर्ल्ड इकनॉमिक फोरम (WEF) चे ते अजेंडा योगदानकर्ता आहेत. तिथे ते जागतिक व्यापार, लॉजिस्टिक्स आणि सस्टेनेबिलिटी यासंबंधी विचार मांडतात.
प्रसिद्ध कॉर्पोरेट वकील सिरिल आमरचंद श्रॉफ यांची कन्या पारिधी श्रॉफ यांच्याशी करन यांचा विवाह झालेला आहे. दाम्पत्याला अनुराधा नावाची एक मुलगीही आहे.
अदानी पोर्ट्स अॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक करन अदानी यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले आहे की, "MSC Irina, जगातील सर्वात मोठं कंटेनर जहाज विझिंजम पोर्टवर येणं ही केवळ बंदरासाठीच नव्हे, तर भारताच्या जागतिक स्तरावर उदयाला येण्याची खूण आहे. ही आमच्या दूरदर्शी ध्येयाची सुरूवात आहे."
18 ते 20 मीटर खोल पाण्याचं निसर्गसिद्ध स्थान, जे 1 किलोमीटरपर्यंत किनाऱ्याजवळ उपलब्ध आहे.
मोठ्या मातृ जहाजांना (mother ships) आणि टँकर्सना थांबण्यास सक्षम.
8900 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विकसित झालेलं हे बंदर सार्वजनिक-खासगी भागीदारीत (PPP) तयार करण्यात आलं आहे.
डिसेंबर 2024 मध्ये व्यावसायिक वापरासाठी अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर हे पहिलं मोठं व्यावसायिक आगमन ठरलं आहे.
यापूर्वी MSC Turkiye हे पर्यावरणपूरक जहाज येथे दाखल झालं होतं, ज्यामुळे विझिंजमचा जागतिक स्तरावर एक डीपवॉटर हब म्हणून दरारा निर्माण झाला आहे.
हे जहाज भारतात प्रथमच दाखल झालं असून, यामुळे भारत आता मोठ्या प्रमाणावर ट्रान्सशिपमेंट (मालाची पुनर्गठित वाहतूक) हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 मे 2025 रोजी या बंदराचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, मुख्यमंत्री पिनरायी विजयन, अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आणि खासदार शशी थरूर उपस्थित होते.
तेव्हा बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की, "आजवर भारतातील 75 टक्के ट्रान्सशिपमेंट परदेशी बंदरांवर होते, ज्यामुळे देशाचं आर्थिक नुकसान होत होतं. विझिंजम बंदर हे चित्र बदलू शकतं."