नवी दिल्ली : जगामध्ये सत्ता आणि जबाबदारी यांचा योग्य मेळ साधणारी, तसेच देशा-देशांमध्ये संघर्षाऐवजी सहकार्याची भावना वाढवणारी नवी जागतिक व्यवस्था केवळ भारताच्या नेतृत्वाखालीच स्थापन होऊ शकते, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. ’इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम 2025’ मध्ये ’संरक्षण, मुत्सद्देगिरी आणि प्रतिबंध : भारताचे सामरिक क्षितिज’ या विषयावर ते बोलत होते.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला ’महामार्गावरील मर्सिडीज’ आणि पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला ’ट्रक’ संबोधल्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना राजनाथ सिंह म्हणाले, मुनीर यांची ही टीका नसून भारत फेरारीच्या वेगाने प्रगती करतो आहे, आणि पाकिस्तान अजूनही मागे राहिला असल्याची कबुलीच आहे. आमचे लक्ष युद्धावर नाही, तर विकासावर आहे. पण, कोणी जर आम्हाला आव्हान दिले, तर आम्ही मागे हटणार नाही. आमची लढाऊ वृत्ती कायम आहे.
गेल्या 11 वर्षांतील भारताच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, देश आता एका परावलंबी अर्थव्यवस्थेतून आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक शक्तीमध्ये रूपांतरित झाला आहे.
भारत आता बहुतांश संरक्षण उत्पादनांमध्ये स्वयंपूर्ण असून सुमारे 100 देशांना निर्यात करत आहे. चालू आर्थिक वर्षात संरक्षण खरेदी 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल.
देशाचे संरक्षण बजेट 6.21 लाख कोटी रुपये असून, त्यापैकी 75 टक्के रक्कम देशांतर्गत कंपन्यांकडून खरेदीसाठी राखीव आहे. यामुळे आपल्या खासगी कंपन्या जागतिक दिग्गजांच्या बरोबरीने येतील.
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवती यांचा दाखला देत ते म्हणाले, पूर्वी जागतिक बँक भारताला काय करावे हे सांगायची, आज भारत जागतिक बँकेला काय करावे हे सांगतो. हे भारताच्या बदलत्या प्रतिष्ठेचे प्रतीक आहे.
राजनाथ सिंह यांनी जागतिक व्यवस्थेबद्दल भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्ही वर्चस्वाच्या स्पर्धेत नाही, तर संवाद, प्रतिष्ठा आणि परस्पर आदरावर विश्वास ठेवतो. सध्याच्या जागतिक व्यवस्थेमुळे काही देश प्रचंड श्रीमंत झाले, पण मोठी लोकसंख्या असमानता आणि असुरक्षिततेचा सामना करत आहे. त्यामुळे नियमांवर आधारित अशा नव्या जागतिक व्यवस्थेची गरज आहे, जिथे सर्वांना समान संधी मिळेल.