नवी दिल्ली : विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत यांनी याच मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा कारंजे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वत:हून दखल घेतली आहे. सुनील राऊतांविरोधात कडक कारवाईचे निर्देशही राष्ट्रीय महिला आयोगाने दिले आहेत.
महिलांच्या हक्कांचा आणि सन्मानाचा अनादर अशा विधानाने होत असल्याचे महिला आयोगाने म्हटले आहे. आयोगाने मुंबई पोलिसांना यासंदर्भात नोंदवलेल्या तक्रारीवर त्वरित कारवाईचे निर्देशही दिले आहेत. निष्पक्ष, निःपक्षपाती आणि कालबद्ध तपासासाठी आयोगाने पोलिस महासंचालकांना (डीजीपी) एक पत्र दिले आहे. तपासाचा अहवाल पोलिसांनी 3 दिवसांत आयोगाला सादर करावयाचा आहे. याआधीही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी महायुतीच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. तेव्हाही राष्ट्रीय महिला आयोगाने उत्स्फूर्तपणे दखल घेतली होती.
एकीकडे संविधान रक्षणाच्या गप्पा केल्या जातात, तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता या मूल्याचेच उल्लंघन भाषणांतून केले जाते. निवडणूक प्रचारात महिलांचा अनादर होणार नाही, याची काळजी सर्वच राजकीय पक्षांनी घ्यायला हवी.विजया रहाटकर, अध्यक्षा, राष्ट्रीय महिला आयोग