राष्ट्रीय

Narendra Modi : पंचायत राज संस्थांत महिलांचा वाढता सहभाग, महिला नेतृत्वाचे प्रभावी उदाहरण

संसद नवीन इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील पंचायत राज संस्थांमधील महिलांचा वाढता सहभाग हे महिला नेतृत्वाचे प्रभावी उदाहरण ठरत आहे. भारत एकविसाव्या शतकातील एक मोठा निर्णय घेण्यासाठी सज्ज असून हा निर्णय नारी शक्तीला समर्पित आहे. हा क्षण ऐतिहासिक असून देशाची संसद भूतकाळातील दूरदृष्टी आणि भविष्यातील संकल्प पूर्ण करणारा एक नवीन इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राजधानी दिल्लीत आयोजित ‌‘नारी शक्ती वंदन‌’ संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर उपस्थित होत्या.

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने देशात सुरू असलेल्या बदलांचा आढावा घेत मोदी म्हणाले, पंचायत राज व्यवस्थेत आज सुमारे 14 लाखांहून अधिक महिला कार्यरत असून अनेक राज्यांमध्ये त्यांचा सहभाग 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हा सक्रिय सहभाग देशाच्या लोकशाहीला अधिक बळकट करणारा आहे. देशाची संसदही आता एका ऐतिहासिक टप्प्यावर उभी आहे, असे म्हणत त्यांनी ‌‘नारी शक्ती वंदन‌’ विधेयकाचा उल्लेख केला. या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे महिलांचे लोकसभा आणि विधानसभांमधील प्रतिनिधित्व वाढणार असून सामाजिक न्याय अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काळात या प्रक्रियेला गती देण्यासाठी संसदेत विशेष अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, महिलांनी केवळ राजकारणातच नव्हे तर शिक्षण, विज्ञान, उद्योग आणि संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकेकाळी पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रांमध्येही आज महिला मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. केंद्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या असून शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षा या सर्व स्तरांवर महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. जनधन, उज्ज्वला, आयुष्मान भारत यांसारख्या योजनांचा मोठा लाभ महिलांना झाला आहे. महिलांच्या सहभागामुळे निर्णय प्रक्रियेत अधिक संवेदनशीलता येते आणि पाणी, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत विषयांवर अधिक प्रभावी काम होते. देशाच्या विकासात नारी शक्तीची भूमिका अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन करत मोदी यांनी महिलांना सक्रिय सहभागासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT