पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वी आज (दि.३१ मार्च) दंतेवाडा विजापूर सीमेवर पोलिस-नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये एका महिला नक्षलवादीचा मृत्यू झाला. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव रॉय यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
दांतेवाडा आणि विजापूरच्या सीमा भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळी ९ वाजल्यापासून चकमक सुरू आहे. याबाबत दंतेवाडा पोलिस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितले की, बस्तर प्रदेशातील दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या जंगलात सकाळी ९ वाजता सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाले होते. तेव्हा ही चकमक सुरू झाली. चकमकीत रेणुका उर्फ बानू नावाचा एक नक्षलवादी ठार झाली. तिच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. चकमकीच्या ठिकाणाहून एक इन्सास रायफल, इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक गौरव रॉय म्हणाले की, आतापर्यंत चकमकीच्या ठिकाणाहून एका महिला नक्षलवादीचा मृतदेह सापडला आहे. तिच्याकडून एक रायफल, दारूगोळा आणि दैनंदिन वापराच्या इतर वस्तूही सापडल्या आहेत. नक्षलवादीविरोधी कारवाई अजूनही सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे. चकमक संपल्यानंतर अधिक माहिती उपलब्ध होईल.
रविवारी विजापूर जिल्ह्यात ५० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यापैकी १४ जणांवर एकूण ६८ लाख रुपयांचे बक्षीस होते. त्यांनी राज्य पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर शस्त्रांसह आत्मसमर्पण केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.