कोची; वृत्तसंस्था : तब्बल 4.27 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेली, दोन अजामीनपात्र वॉरंट आणि लूकआऊट नोटीस जारी झालेली एक महिला चक्क ब्रिटनमधून भारतात आली. आपला पासपोर्ट नूतनीकरण (रिन्यू) केला आणि पुन्हा ब्रिटनला परत गेल्याने खळबळ उडाली आहे.
‘प्रकाशांते मेट्रो’ या मल्याळम चित्रपटाची दिग्दर्शिका हसीना बीवी ऊर्फ हसीना सुनीर असे या आरोपी महिलेचे नाव आहे. तक्रारदार सुनील जी. आर. नायर यांच्या म्हणण्यानुसार, हसीना हिने त्यांच्याकडून 1.17 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तक्रारदाराने वारंवार तक्रारी आणि सूचना देऊनही अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
काही काळानंतर नूरनाड पोलिसांनी हसीनाला अटक केली; परंतु तिला न्यायालयात हजर करताना तिच्यावरील अजामीनपात्र वॉरंटची माहिती दिली नाही. त्यामुळे तिला सहज जामीन मिळाला आणि तिने नूतनीकरण केलेल्या पासपोर्टच्या आधारे 25 जुलै रोजी ब्रिटनला पलायन केले.