राज्यसभेचे कामकाज 11.45 वाजता पुन्हा सुरू झाले, मात्र विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केला. यावर नाराजी व्यक्त करत राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. संविधान दिनानिमित्त उद्या, मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरू राहणार नाही. त्यामुळे बुधवारी पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू होणार आहे.
गौतम अदानींच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ झाला. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी केली, परंतु राज्यसभा अध्यक्षांनी नियमांचा हवाला देत त्यास परवानगी दिली नाही. गदारोळामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज 11.45 वाजेपर्यंत तहकूब केले.
महाराष्ट्रातील विजयाबद्दल सत्ताधारी पक्ष पंतप्रधानांचे अभिनंदन करणार.
उत्तर भारतातील वायू प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसचे रंजीत रंजन यांनी राज्यसभेत नोटीस दिली आहे.
समाजवादी पक्ष संभल हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता.
या सत्रात प्रियांका गांधी वाड्रा यांचे लोकसभेत पदार्पण होईल.
सोबतच महाराष्ट्रातून नांदेड येथून विजयी झालेल्या रवींद्र चव्हाण खासदार म्हणून घेणार शपथ.
वक्फ विधेयकासंदर्भात विरोधी पक्षाने नियुक्त केलेल्या जेपीसीला मुदतवाढ मागितली आहे, परंतु सरकार ही मुदतवाढ देणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक सरकार मांडण्याची शक्यता.
महाराष्ट्राच्या पराभवावर काँग्रेसच्या विरोधात टीएमसी बोलल्याने विरोधक एकत्र राहणार का? हे पाहणं महत्त्वाचे आहे.
अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदी म्हणाले की, "जनतेने नाकारलेले काही लोक गुंडागर्दीच्या माध्यमातून संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतात. देशातील जनता त्यांच्या सर्व कृत्यांची मोजदाद करते आणि वेळ आली की त्यांना शिक्षाही होते. पण सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे नवे खासदार नवीन विचार, नवी ऊर्जा घेऊन येतात आणि ते कोणत्याही एका पक्षाचे नसून सर्व पक्षांचे असतात. त्यांना बोलण्याची संधीही मिळत नाही, पण ज्यांना जनतेने 80-90 वेळा नाकारले आहे, त्यांना ना लोकशाहीच्या भावनेचा आदर आहे, ना त्यांना जनतेच्या आकांक्षांचे महत्त्व आहे. त्यांच्याबद्दलची जबाबदारी ते त्यांना समजू शकत नाहीत आणि याचा परिणाम असा होतो की ते लोकांच्या अपेक्षा कधीच पूर्ण करत नाहीत. संसद सदस्यांनी जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण कराव्यात."
पुढारी ऑनलाईन डेस्क : Parliament Winter Session | संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. वक्फ बोर्ड दुरुस्तीसह या अधिवेशनात सरकारकडून १६ विधेयके मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, नियमानुसार विषय मांडण्यात येतील, असे आश्वासन सरकारच्या वतीने बैठकीत देण्यात आले. देशाने संविधान स्वीकारले त्याला ७५ वर्षे होत आहेत. त्यानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी संविधान सभागृहाच्या मध्यवर्ती सभागृहात विशेष कार्यक्रम होणार आहे. त्याबाबतही सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली.