राष्ट्रीय

तूर, उडीद डाळींचे भाव घसरणार?

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  देशात तूर आणि उडीद डाळीचे भाव अजूनही चढेच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहे. मात्र, केंद्र सरकार आता तूर आणि उडीद डाळींचे भाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असून या डाळींचा साठा मर्यादा ३१ ऑक्टोबरच्या पुढे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डाळींचे भाव कमी शक्यता व्यक्त होत आहे.

डाळींच्या उत्पादनात घट आणि आयात मंदावण्याच्या शक्यतेमुळे, जूनमध्ये लागवड केलेल्या डाळींच्या वाणांसाठी स्टॉक होल्डिंग मर्यादा किमान तीन महिन्यांसाठी वाढवली जाईल. ग्राहक व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार, वर्षाच्या सुरुवातीच्या किमतीच्या तुलनेत बुधवारी तुरीची बाजारात किंमत ४५ टक्क्यांनी वाढून १६० रुपये प्रति किलो झाली आहे. मात्र, अनेक केंद्रांवर किरकोळ विक्रीचा दर १७० रुपये किलोच्या पुढे गेला आहे. उडीद डाळीची किरकोळ बाजारात किंमत ११० रुपये प्रति किलो होती, जी सहा महिन्यांपूर्वीच्या किमतीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढली आहे. सरकारने घाऊक विक्रेत्यांसाठी २०० टन, किरकोळ विक्रेत्यांसाठी ५ टन, किरकोळ आउटलेटवर ५ टन, मोट्या विक्रेत्यांसाठी डेपोमध्ये २०० टन साठा ठेवण्याची मर्यादा लागू केली होती..

मागणी वाढल्यास भाव आणखी वाढणार?

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मागणी वाढल्याने पुढील महिन्यात भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच यंदा पडलेल्या कमी पावसामुळे खरीप हंगामात घट झाल्यामुळे देशांतर्गत भाववाढ होण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत सुमारे ०.१ दशलक्ष टन तूर डाळीचा मासिक पुरवठा झाल्यास किमती कमी होऊ शकतात. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यावर्षी पेरणी ५.६% ने घटून ४३ लाख हेक्टरवर आली आहे आणि नोव्हेंबरपर्यंत पीक कापणी अपेक्षित आहे.

SCROLL FOR NEXT