पुढारी ऑनलाईन डेस्क : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स लवकरच भारताला भेट देणार असून, या भेटीदरम्यान त्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या टीमलादेखील भेटण्याची योजना आखत आहेत. याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. ९ महिने अंतराळात राहून, पृथ्वीवर परतल्यानंतर पहिल्यांदाच सोमवारी (दि.३१) नासाने घेतलेल्या एका मुलाखतीत त्या बोलत होत्या.
एक आठवड्यासांठी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर अंतराळात गेले होते. गेल्या वर्षी बोईंग स्टारलाइनरमधून ते अंतराळात रवाना झाले होते. पण अंतराळ यानात तांत्रिक बिघाड आणि हवामान बदलामुळे ते तब्बल ९ महिने अंतराळातच अडकले राहिले होते. दरम्यान १८ मार्च रोजी एलन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन अंतराळयानातून फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर हे दोघे सुरक्षित उतरले. त्यानंतर सुनीता यांनी नासाच्या एका मुलाखतीत त्या भारतात जाणार असल्याचे म्हटले आहे.
सुनीता विल्यम्स यांनी भारताबद्दल बोलताना म्हटले आहे की, माझ्या वडिलांच्या मायभूमीत म्हणजेच भारतात मला जायचे आहे. तेथील लोकांशी भेटायचे आहे. तसेच इस्रोची टीम आणि ऑक्सिओम मोहिमेवर जाणाऱ्या भारतीय अंतराळवीरांनी भेटण्यासाठी त्या उत्सुक असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे. भारत हा एक महान देश आणि एक अद्भुत लोकशाही आहे. जी अंतराळात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला याचा एक भाग होऊन भारताला मदत करायची आहे, असेदेखील सुनीता विल्यम्स यांनी म्हटले आहे.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंतराळवीर राकेश शर्मा यांना अंतराळातून भारत कसा दिसतो? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा राकेश शर्मा यांनी कवी मुहम्मद इक्बाल यांच्या "सारे जहाँ से अच्छा" या ओळीचा उल्लेख केला होता. आता, चार दशकांनंतर, भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी भारताचे वर्णन अद्भुत असे केले आहे. जेव्हा सुनीता विल्यम्स यांना विचारण्यात आले की भारत अंतराळातून कसा दिसतो, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, "आश्चर्यकारक, फक्त आश्चर्यकारक....".
आम्ही जेव्हा जेव्हा हिमालयावरून जात होतो तेव्हा बुच विल्मोर यांनी त्यांचे अविश्वसनीय फोटो काढले. अवकाशातून हिमालयाचे दृश्य अद्भुत आहे. आम्हाला असे वाटले की, भारतात अवकाशात लहरी उमटत आहेत आणि त्या खाली वाहत आहेत. भारताचे अनेक रंग आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना किनाऱ्यांवर मासेमारी करणाऱ्या बोटींचा ताफा गुजरात आणि मुंबईच्या आगमनाचे संकेत देतो. दिवसा हिमालय पाहणे आश्चर्यकारक होते. भारतात मोठ्या शहरांपासून ते लहान शहरांपर्यंत रात्रीच्यावेळी अविश्वसनीय दिसणारे दिव्यांचे जाळे दिसते, असेही त्या म्हणाल्या.