पुढारी ऑनलाईन डेस्क: Indian Republic Day 2025 | भारतीय प्रजासत्ताक दिनासाठी देशाची राजधानी दिल्लीत तयारी सुरू आहे; परंतु २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुणे कोण असेल?, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांना २६ जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताक सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आल्याचे वृत्त ANIने दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे असतील. भारत आणि इंडोनेशिया राजनैतिक संबंधांची ७५ वर्षे साजरी करत असताना इंडोनेशियन नेत्यांची ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुबियांतो यांची गेल्या वर्षी रिओ येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या वेळी पहिली भेट झाली. त्यांच्या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा प्रसंग योग्य पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन नेत्यांनी केले.
इंडोनेशियन राष्ट्रपतींनी भारत भेटीनंतर थेट पाकिस्तानला जावू नये, अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. कारण यामुळे चुकीचा संदेश जाईल. दहशतवादामुळे भारताने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडले आहेत. भारताने राजनैतिक माध्यमातून इंडोनेशियासमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभानंतर सुबियांतो यांना पाकिस्तानला न जाण्यासाठी राजी केले जाऊ शकेल, अशी आशा आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात भेट दिल्यानंतर इंडोनेशियाचे राष्ट्रपती भारतातून थेट पाकिस्तानला गेले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. कारण यापूर्वीही इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष भारत भेटीनंतर पाकिस्तानला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. २०१८ मध्ये, माजी राष्ट्रपती जोको विडोडो यांनी प्रजासत्ताक दिनानंतर पाकिस्तानला भेट दिली, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. अशा परिस्थितीत केंद्र सरकारला असे वाटते की २०१८ ची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये. इंडोनेशिया आणि भारताचे पारंपारिकपणे चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारतासाठी हे महत्वाचे आहे की ही भेट सकारात्मक पद्धतीने संपेल आणि त्याभोवती कोणताही वाद होणार नाही.