पाटणा; वृत्तसंस्था : मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केल्याशिवाय महाआघाडी बिहारच्या निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाही, अशी भूमिका राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी घेतल्याने इतर पक्षांवर दबाव वाढला आहे.
काँग्रेस आणि सीपीआय-एमएल (लिबरेशन) या मित्रपक्षांनी मात्र तेजस्वी यांच्या भूमिकेशी असहमत असल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसने निवडणुकीनंतर जनतेच्या मतानुसार मुख्यमंत्री निवडला जाईल, असे म्हटले आहे. तर सीपीआय-एमएलचे सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य यांनीही विजयानंतरच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. तेजस्वी हे नैसर्गिक पर्याय असले तरी अंतिम निर्णय निवडणुकीनंतरच होईल, असेही त्यांनी नमूद केले.
याचवेळी, तेजस्वी यादव यांनी राष्ट्रीय स्तरावर ‘इंडिया’ आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून राहुल गांधींच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र, राहुल गांधींनी तेजस्वींना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाठिंबा देण्याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. यावरून महाआघाडीत अंतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे.