माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जम्मू-काश्मीरच्या 'लाल चौकात जायला भीती वाटत होती'असे विधान केले आहे.  Pudhari News Network
राष्ट्रीय

सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याने भाजपला मिळू शकते ‘निवडणूक संजीवनी’?

पुढारी वृत्तसेवा

प्रथमेश तेलंग

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जम्मू-काश्मीरबाबत 'लाल चौकात जायला भीती वाटते' या विधानाने भाजपला निवडणूक प्रचाराचा मोठा मुद्दा दिला आहे. आता या मुद्द्याचे भांडवल करण्याची एकही संधी भाजप सोडणार नाही. भाजप केवळ जम्मू-काश्मीरमध्येच नव्हे, तर महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही त्याचा वापर करेल. मोदी सरकारमध्ये दहशतवाद्यांना भीती वाटते, तर यूपीए सरकारमध्ये गृहमंत्री लाल चौकात जायला घाबरत होते, असा प्रचार भाजप करण्याची शक्यता आहे. हे यश मोदी सरकारचे असल्याचे भाजप प्रचार करेल.

वक्तव्यावरून  प्रचार करणार

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु आहे. केंद्र सरकारने कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरच्या विकासाचा मार्ग कसा मोकळा केला? , या मुद्द्याचा भाजप प्रचार करत आहे. जम्मू-काश्मीरसह हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही भाजप यावरुन प्रचार करणार हे नक्की होते. आता सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याने सत्ताधारी भाजप आणि एनडीए कलम ३७० हटवल्याने जम्मू-काश्मीरमध्ये कसे जनहित साधले गेले? याचा प्रचार आणखी जास्त करण्याची शक्यता आहे.

‘फाईव्ह डीकेड्स ऑफ पॉलिटीक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन 

सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘फाईव्ह डीकेड्स ऑफ पॉलिटीक्स’ या पुस्तकाचे सोमवारी (९ सप्टेंबर) सायंकाळी, दिल्लीत प्रकाशन झाले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलताना त्यांनी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्याबद्दल आठवण काढली. सुशील कुमार शिंदे यांनी गृहमंत्री असताना श्रीनगरमधील डीपीएस शाळेला भेट दिली होती. ही शाळा विजय धर चालवायचे. तेव्हाचा एक प्रसंग शिंदे यांनी सांगितला.

लाल चौकात जाताना मी घाबरलो होतो? 

ते म्हणाले की, गृहमंत्री होण्यापूर्वी त्यांना (शिक्षणतज्ज्ञ विजय धर) भेटायला गेलो होतो. मी त्यांना सल्ला विचारायचो, त्यांनी मला सल्ला दिला. इकडे तिकडे फिरू नका, तर लाल चौकात (श्रीनगर) जा, लोकांना भेटा आणि दाल सरोवराभोवती फिरायला जा. या सल्ल्याने मला प्रसिद्धी मिळाली आणि लोकांना वाटले की इथे एक गृहमंत्री आहे, जो बिनधास्त जातो, पण कुणाला सांगू, मी घाबरलो होतो?

त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेस काळात जम्मू-काश्मीरमध्ये जायला देशाचे गृहमंत्र्यांना भीती वाटायची, आता श्रीनगरच्या लाल चौकात कोणीही फिरू शकते. एकंदर संपूर्ण जम्मू-काश्मीरमधील भीती कमी झाली आहे. कलम ३७० हटवल्याचा हा परिणाम आहे, असा युक्तीवाद भाजपकडून केला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT