High Court Ruling False Allegations Cruelty : पती-पत्नीमध्ये संबंध बिघडले, दोघांनाही एकमेकांबद्दल सहानुभूती नसली तरी ते प्रतिमा आणि चरित्र कलंकित करणारे खोटे आरोप करण्याचे निमित्त होत नाही. पती असो की पत्नी, नाते बिघडले म्हणून प्रतिमा आणि चरित्र कलंकित करणारे आरोप करणे ही एक क्रूरताच आहे. हीच क्रूरता घटस्फोट मंजुरीचा आधार ठरते, असे निरीक्षण नोंदवत पत्नीने खोटे आरोप केल्याचा दावा केलेल्या पतीला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला.
'लाईव्ह लॉ'ने दिलेल्या वृत्तानुसार, २००२ मध्ये विवाहबद्ध झालेले दांपत्याला एक मुलगाही झाला.पराकोटीच्या मतभेदांमुळे दांपत्य २०१९ पासून विभक्त राहत होते.पतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली तर पत्नीने घरगुती हिंसाचार कायदा २००५ च्या कलम १२ अंतर्गत पतीविरुद्ध खटला देखील दाखल केला होता.याच काळात पत्नीने आपल्या पतीचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. कौटुंबिक न्यायालयाने केवळ न्यायालयीन विभक्ततेला मंजुरी दिली.केवळ न्यायालयीन विभक्तता नको, तर घटस्फोट हवा असल्याने पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.पत्नीनेही परस्पर आक्षेप घेऊन न्यायालयीन विभक्ततेच्या हुकुमाला आव्हान देत वैवाहिक संबंध कायम राहण्यासाठी प्रयत्नशील होती.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विशाल धागत आणि न्यायमूर्ती अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, पती असो की पत्नी, दोघांपैकी एकाने अनैतिक संबंधाचे निराधार आणि खोटे आरोप केल्यास वैवाहिक नातेसंबंध धोक्यात येतो. या प्रकरणी पत्नीने पतीवर अनैतिक संबंधांबाबत खूप गंभीर आरोप केले. मात्र तिने या आरोपांबबात सादर केलेले फोटो आणि मोबाईल फोनवरील चॅटिंग सिद्ध झाले नाही. आरोप सिद्ध करण्यात ती अपयशी ठरली. आरोप खरे असल्याचे तिने सिद्ध केले पाहिजे होते. तिच्याकडून विश्वासार्हतेला पात्र असे काहीही सिद्ध झालेले नसल्यामुळे या आरोपांमुळे पतीला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. निराधार आरोपांमुळे क्रूरतेचा सामना करावा लागला , ही पतीची तक्रार अतिशयोक्तीपूर्ण नाही. एखाद्याच्या जोडीदारावर अनैतिक संबंधांचे खोटे आरोप करणे क्रूरता आहे. घटस्फोटासाठी ते एक आधार असू शकतो.पत्नीला राग आला म्हणून तिने निराधार आरोप करून पतीची प्रतिमा कलंकित करण्याचा अधिकार मिळत नाही."
"आम्हाला माहिती आहे की या खटल्यातील पती आणि पत्नीमधील संबंध इतके कटु झाले होते की दोघांपैकी कोणालाही एकमेकांबद्दल सहानुभूती नव्हती; परंतु अशा प्रकारचे नाते देखील दुसऱ्या पक्षाच्या नैतिक चारित्र्याबद्दल खोटे आरोप करण्याचे निमित्त असू शकत नाही.अशा प्रकारे, क्रूरतेच्या या आधारावर, पती घटस्फोटाचा हुकूम देण्यास पात्र आहे.घटस्फोट मंजूर न करण्याचे कोणतेही तर्कसंगत समर्थन नाही," असेही खंडपीठाने स्पष्ट केले.