न्यायाधीश यशवंत वर्मा  Pudhari Photo
राष्ट्रीय

घटनेची माहिती सरन्यायाधीशांना ६ दिवसांनंतर का देण्यात आली ?

Yashwant Verma Delhi HC Judge | न्यायाधीश वर्मा प्रकरणी मुकुल रोहतगी यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी लागलेली आग आणि त्यापुढे घडलेल्या सर्वच गोष्टींना आता आणखी वेगळे वळण मिळाले. माजी अॅटर्नी जनरल तसेच ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनीही या प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेची माहिती सरन्यायाधीशांना ६ दिवसांनंतर का देण्यात आली? असा प्रश्न विचारत मुकुल रोहतगी यांनी न्यायाधीश यशवंत वर्मा प्रकरणावर पारदर्शकतेची मागणी केली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची स्पष्ट माहिती देण्यासाठी एक बुलेटिन जारी करण्याची विनंती केली. तसेच घटनेच्या माहितीत होणारा विलंब आणि तपशीलांचा अभाव याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, देशभरातील राजकारण्यांपासून ते ज्येष्ठ वकिलांपर्यंत, अनेकांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

मुकुल रोहतगी म्हणाले की, 'सदर घटनेत पारदर्शकतेच्या अभावामुळे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत. न्यायाधीश वर्मा यांच्या घराला लागलेल्या आगीची माहिती कोणी दिली? अग्निशमन विभाग कधी आला? पैसे मिळाले की मिळाले नाहीत? पैसे मिळाले नाहीत असे अग्निशमन विभागप्रमुखांनी आधीच का म्हटले? किती खोल्या तपासल्या गेल्या? पैसे घरात सापडले की नोकरांच्या क्वार्टरमध्ये? दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा अहवाल सार्वजनिक का करण्यात आला नाही? असे अनेक प्रश्न मुकुल रोहतगी यांनी उपस्थित केले.

मुकुल रोहतगी म्हणाले की, सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतरच आपल्याला घटनेची संपूर्ण माहिती मिळू शकेल. घटनेच्या वेळेवर प्रश्न उपस्थित करताना रोहतगी म्हणाले की, ही घटना १४ मार्च रोजी घडली, मात्र या घटनेची माहिती २० मार्च रोजी सरन्यायाधीशांना का देण्यात आली. या सर्व कारणांचीही चौकशी झाली पाहिजे.

पोलिसांना चौकशीची परवानगी द्यावी- रोहतगी

रोहतगी म्हणाले की जर हे प्रकरण स्पष्ट असेल तर सरन्यायाधीशांनी पोलिसांना सखोल चौकशी करण्याची परवानगी द्यावी. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या मदतीशिवाय इतकी गंभीर चौकशी करू शकतील का, याबद्दल शंका आहे. ही सामान्य चौकशी नाही, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT