E20 Petrol Explained: देशात प्रदूषण कमी करणे, कच्च्या तेलाची आयात कमी करणे आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा वेग वाढवला आहे. सध्या देशभरात E20 पेट्रोल उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र, अनेक वाहनचालकांच्या मनात एक प्रश्न आहे की, पेट्रोल पंपावर E10 (10% इथेनॉल) आणि E20 (20% इथेनॉल) यापैकी हवा तो पर्याय का मिळत नाही? यावर केंद्र सरकारने सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मते, भारतातील इंधन वितरण व्यवस्था इतकी मोठी आहे की, एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारचे पेट्रोल साठवणे आणि वितरित करणे अत्यंत कठीण आहे.
देशात एक लाखांहून अधिक पेट्रोल पंप, शेकडो डेपो, रिफायनरी, पाइपलाइन आणि टर्मिनल्सचे जाळे आहे. प्रत्येक ठिकाणी E10 आणि E20 अशी स्वतंत्र पुरवठा व्यवस्था उभारावी लागल्यास त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल. तसेच इंधनाचा साठा आणि वितरण व्यवस्थापनही अधिक गुंतागुंतीचे होईल.
सरकारने स्पष्ट केले की, पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. वाहन उत्पादक कंपन्या आणि तज्ज्ञांशी दीर्घ चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेत वाहनांची सुसंगतता, इंजिनची कार्यक्षमता, इंधन कार्यक्षमता आणि प्रदूषण यांची तपासणी करण्यात आली आहे.
E20 मुळे जुन्या वाहनांचे नुकसान होईल, अशी भीती अनेक वाहनचालक व्यक्त करत आहेत. मात्र, सरकारने हा दावा फेटाळला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, वाहन उत्पादक कंपन्यांशी सल्लामसलत करूनच इथेनॉलचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कंपन्या जुन्या आणि नव्या दोन्ही वाहनांवर वॉरंटी देत आहेत.
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सुमारे 2.84 कोटी वाहनांची सर्व्हिसिंग केली. यापैकी जवळपास 1.5 कोटी वाहने E20 प्रमाणित नव्हती. तरीही इथेनॉलमुळे इंजिन खराब होणे किंवा गंज लागणे अशा स्वरूपाच्या कोणत्याही मोठ्या तक्रारी आल्या नाहीत. दुचाकी उत्पादक हिरो मोटोकॉर्पचाही अनुभव याच प्रकारचा असल्याचे सरकारने सांगितले.
सरकारने मान्य केले की, E20 पेट्रोल वापरल्यास वाहनाच्या मायलेजमध्ये 3 ते 5 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. मात्र, इंधनाची गुणवत्ता केवळ मायलेजवर ठरत नाही.
E20 पेट्रोलचा ऑक्टेन क्रमांक अधिक चांगला असल्याने इंधन अधिक प्रभावीपणे जळते. त्यामुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारते, वाहनाचा पिक-अप चांगला मिळतो आणि इंजिन आतून अधिक स्वच्छ राहण्यास मदत होते.
सरकारच्या मते, E20 पेट्रोलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार्बन उत्सर्जनात घट होते. त्यामुळे वायू प्रदूषण कमी करण्यास मदत होते.
याशिवाय, इथेनॉल उत्पादनासाठी ऊस आणि इतर कृषी पिकांचा वापर होत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. तसेच कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च कमी होऊन देशाची ऊर्जा सुरक्षा (Energy Security) अधिक मजबूत होण्यास मदत होते.
केंद्र सरकारच्या मते, E20 पेट्रोलचा वापर वाढवण्यामागे केवळ पर्यावरण संरक्षणाचा विचार नाही, तर देशाची इंधन स्वयंपूर्णता वाढवणे, परकीय चलनाची बचत करणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हेही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सध्या पेट्रोल पंपांवर E10 आणि E20 असा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यापेक्षा एकसमान इंधन वितरण व्यवस्था कायम ठेवणे अधिक व्यवहार्य असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.