Taslima Nasreen on Bangladesh Hindu murder
नवी दिल्ली : बांगलादेशात एका २५ वर्षीय हिंदू तरुणाची जमावाकडून ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवर प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, या क्रूर कृत्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा कोण देणार, असा सवाल उपस्थित केला आहे.
बांगलादेशमध्ये जमावाने हत्या केलेल्या तरुणाचे नाव दिपू चंद्र दास असे आहे. बांगलादेशमधील मैमनसिंगमधील भालुका येथील एका कारखान्यात कामगार होता. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिपू पोलिसांच्या गणवेशातील काही व्यक्तींना काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र, या संवादानंतर काही वेळातच संतप्त जमावाने त्याची निर्घृण हत्या केली.
तस्लिमा नसरीन यांचा गंभीर आरोप प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एक्सवर पोस्ट करत या घटनेचा घटनाक्रम मांडला आहे. त्यांच्या मते, दिपूच्या हत्येत पोलिसांची भूमिका संशयास्पद असू शकते. त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले की, दिपू हा एक गरीब मजूर होता.एका क्षुल्लक वादातून त्याच्या मुस्लीम सहकाऱ्याने दिपूवर प्रेषितांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा खोटा आरोप जाहीरपणे केला.या खोट्या आरोपामुळे चिडलेल्या जमावाने दिपूवर हल्ला केला.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह मिळालेल्या माहितीनुसार, दिपूने पोलिसांना तो निर्दोष असल्याचे आणि हा त्याच्या सहकाऱ्याचा कट असल्याचे वारंवार सांगितले होते. मात्र, पोलिसांनी त्या सहकाऱ्यावर कोणतीही कारवाई केली नाही. भारतविरोधी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर ढाका आणि परिसरात हिंसक निदर्शने सुरू असतानाच, ढाक्यापासून दूर असलेल्या मैमनसिंगमध्ये ही घटना घडली आहे. तस्लिमा नसरीन यांनी या प्रकरणातील गुन्हेगारांना खरोखरच शिक्षा होईल का? असा प्रश्न विचारत बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा जागतिक स्तरावर लक्ष वेधले आहे.