नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय महसूल सचिव संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) नवे गव्हर्नर (RBI Governor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा आरबीआयचे (Reserve Bank of India) २६ वे गव्हर्नर असतील. मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२४ ला संपणार आहे. डिसेंबर २०१८ रोजी शक्तिकांत दास यांना गव्हर्नर बनवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ आणखी तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला होता. दरम्यान, ११ डिसेंबरला संजय मल्होत्रा गव्हर्नरपदाचा कार्यभार स्वीकारतील. केंद्र सरकारने सोमवारी संजय मल्होत्रा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
संजय मल्होत्रा हे १९९० च्या बॅचचे राजस्थान केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. संजय मल्होत्रा मूळचे राजस्थानातीलच आहेत. जवळपास ३३ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या मल्होत्रा यांनी आयआयटी कानपूरमधून संगणक शास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. तसेच सार्वजनिक धोरणात त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. मल्होत्रा यांनी आजवर ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात काम केले आहे.