Jyoti Malhotra YouTuber arrested
दिल्ली : हरियाणातील प्रसिद्ध ट्रॅव्हल यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योतीने यावर्षी पाकिस्तानला भेट दिली होती. त्या भेटीतील अनेक व्हिडीओ तिने पोस्ट केले होते. पाकिस्तानी एजंट्ससोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याबद्दल सहा जणांसह ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. 'ट्रॅव्हल विथ जो' हे युट्यूब चॅनल ती चालवते. तिचे सुमारे ३.७७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
तिच्या अकाउंटवरून असे दिसून येते की तिने संपूर्ण भारतात तसेच इंडोनेशिया आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवास केला. मात्र सर्वात जास्त पाकिस्तानच्या तिच्या प्रवासातील व्हिडिओ आणि रील्स हे विशेष आकर्षण आहे. लाहोर, पाकिस्तानलामधील व्हिडिओ सुमारे दोन महिन्यांपूर्वी पोस्ट करण्यात आले आहेत. अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानमध्ये प्रवेश, लाहोरमधील अनारकली बाजारात फेरफटका, बसप्रवास, तसेच कतासराज मंदिराला दिलेली भेट तिने व्हिडिओमध्ये दाखवली आहे. तिच्या व्हिडीओजमधून पाकिस्तानच्या संस्कृतीबद्दल सकारात्मक बाजू दाखवण्याचा प्रयत्न दिसतो. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेत पाक एजंटांनी तिला प्रचारासाठी वापरले.
तिच्या इंस्टाग्राम हँडलवरील एका फोटोमध्ये उर्दूमध्ये "इश्क लाहोर" असे कॅप्शन आहे. पाकिस्तानी खाद्यपदार्थ, लोकसंस्कृती, भारत-पाकमधील सांस्कृतिक तुलना या विषयांवर तिचे व्हिडीओ चर्चेत आले. तपास यंत्रणांनी तिच्या पाकिस्तान दौऱ्याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर ती केवळ पर्यटक म्हणून गेलेली नव्हती, हे पुरावे आता समोर येत आहेत.
ज्योतीने २०२३ मध्ये पहिल्यांदा एजंटमार्फत व्हिसा मिळवून पाकिस्तानला भेट दिली. त्यावेळी पाकिस्तान हाय कमिशनमध्ये कार्यरत असलेल्या एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश या अधिकाऱ्याशी तिचा परिचय झाला. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्याने तिला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी जोडले. भारतात परतल्यानंतरही ती सोशल मीडियाच्या आधारे संपर्कात राहिली. एजंटांची नावे खोट्या नावांनी सेव्ह करून ती संवाद साधत होती. तीने पाकिस्तानला एकूण तीन वेळा भेट दिली. यातील एका पाकिस्तानी गुप्तचर एजंटाशी तिचे जवळचे संबंध होते. ती त्याच्यासोबत बाली, इंडोनेशिया येथेही गेली होती, अशी माहितीही समोर आली आहे. तपास संस्थांच्या मते मल्होत्रा एका मोठ्या हेरगिरी नेटवर्कचा भाग होती, ज्याचे कार्यकर्ते हरियाणा आणि पंजाबमध्ये पसरलेले होते.
मल्होत्राने गेल्या वर्षी काश्मीरलाही भेट दिली होती, ज्यामध्ये ती दाल सरोवरात आनंद घेत असल्याचे व्हिडिओ दाखवले होते. तिने श्रीनगर ते बनिहाल असा ट्रेन प्रवास करतानाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. पहलगाम हल्ल्या आणि ऑपरेशन सिंदूर नंतर तिने एक व्हिडिओ केला होता, ज्यामध्ये "पहलगाम काश्मीरबद्दल माझे विचार: आपण पुन्हा काश्मीरला भेट देऊ का?" असे म्हटले होते.