Purvanchal Expressway car romance video UP
सुलतानपूर: उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर प्रवास करणाऱ्या लोकांचे खासगी क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुलतानपूर येथील हलियापूर टोल प्लाझाजवळ तैनात असलेल्या ATMS (अँटी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) चा असिस्टंट मॅनेजर आशुतोष सरकार याच्यावर नवविवाहित जोडप्याला ब्लॅकमेल करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप आहे.
एक्सप्रेसवेवरून प्रवास करणारे एक नवविवाहित जोडपे टोल प्लाझापासून काही अंतरावर कार थांबवून खासगी क्षण घालवत होते. रस्त्यावर सुरक्षेसाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आशुतोष सरकारने ते क्षण रेकॉर्ड केले. यानंतर तो थेट घटनास्थळी पोहोचला आणि जोडप्याला धमकावले. व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी त्याने त्यांच्याकडून ३२ हजार रुपये घेतले. मात्र, पैसे घेऊनही त्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे घाबरलेल्या जोडप्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी असिस्टंट मॅनेजर आशुतोष सरकारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नवविवाहीत जोडप्याचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करणारा आशुतोष सरकार पूर्वांचल एक्सप्रेसवेच्या पॅकेज-३ वर आउटसोर्सिंग कंपनी सुपर वेव्ह कम्युनिकेशन अँड इन्फ्रा सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत होता. ही कंपनी NHAI च्या अंतर्गत काम करत असून तिला मॉनिटरिंगशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती.
हलियापूर टोल प्लाझावर ATMS विभागाचे काम पाहणाऱ्या आशुतोषकडे कॅमेऱ्यांच्या निरीक्षणाची जबाबदारी होती. ATMS चा उद्देश एक्सप्रेसवेवर सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि कोणत्याही दुर्घटनेची तत्काळ सूचना देणे हा आहे. परंतु याच सुविधेचा त्याने गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, दोन दिवसांत आणखी पाच ते सहा पीडितांनी पोलीस आणि प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. पीडितांनी सांगितले की, ATMS मॅनेजर आशुतोष सरकार एक्सप्रेसवेवर लावलेल्या कॅमेऱ्यांचा गैरवापर करत होता. तो कॅमेऱ्यांच्या माध्यमातून महिला, युवतींवर नजर ठेवायचा. कॅमेऱ्यात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसताच, तो व्हिडिओ सेव्ह करायचा. थोड्या वेळाने पीडितांपर्यंत पोहोचून त्यांना धमकी द्यायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा.
दाखल एफआयआरमध्ये म्हटले आहे की, तो केवळ एक्सप्रेसवेवरील वाहनांवरच नव्हे, तर कॅमेऱ्यांची दिशा खाली झुकवून आसपासच्या गावांमधील गल्ल्यांवरही नजर ठेवत असे. त्याने अनेकवेळा ग्रामीण महिला आणि युवतींचे फुटेजही रेकॉर्ड केले होते.