नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय बनावटीचे विदेशी मद्य (आयएएमएफएल) रिचवण्यात कर्नाटक राज्य देशात अव्वल आहे. विशेष म्हणजे, भारतातील मद्य बाजारात दाक्षिणात्य राज्यांची वरचढ पाहायला मिळत आहे. 2024-25 या आर्थिक एएमएफएल विक्रीत एकट्या कर्नाटक राज्याच्या सर्वाधिक 17 टक्के वाटा आहे. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि पुद्दुचेरी या राज्यांचा तब्बल 58 टक्के वाटा आहे. महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानी असून राज्यात वर्षात 24 कोटी लिटर मद्य विक्री झाल्याची माहिती कन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपन्यांनी (सीआयएबीसी) दिली आहे.
सीआयएबीसी च्या अहवालानुसार, देशातील इतर सर्व राज्यांत 42 टक्के मद्य विक्री झाली. या काळात व्हिस्कीच्या एकूण विक्रीत केवळ 1.4 टक्क्यांची वाढ झाली. आर्थिक वर्ष 2024 मधील 39.62 कोटी मद्य पेट्या (356.58 कोटी लिटर) वरून आर्थिक वर्ष 2025 मध्ये 40.17 कोटी मद्य पेट्या (361.53 कोटी लिटर) विकल्या गेल्या. देशाच्या पश्चिमेकडील राज्यांचा मद्यविक्रीत 12 टक्के वाटा आहे. महाराष्ट्रात यात आघाडीवर असून राज्यात 2.71 कोटी मद्यपेट्यांची (24.39 कोटी लिटर) विक्री झाली. पश्चिमेकडील राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्राच्या वाटा तब्बल 58 टक्क्यांचा आहे. तर राष्ट्रीय क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.
कर्नाटकने 6.88 कोटी मद्य पेट्यांची (61.92 कोटी लिटर) विक्री करून मद्यविक्रीत देशात पहिला क्रमांक पटकावला.
पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये मद्य विक्री अनुक्रमे 20 व 15 टक्क्यांनी घसरली. याउलट झारखंड, राजस्थान आणि पुद्दुचेरीसारख्या राज्यांत अनुक्रमे 15, 13 आणि 10 टक्क्यांची मद्य विक्रीत वाढ झाली.