Election Of Loksabha Speaker
India's Parliment Pudhari File Photo
राष्ट्रीय

मोदी, शहा शपथ घेताना विरोधकांकडून संविधान प्रती दाखवून निषेध

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अठराव्या लोकसभेतील संसदेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळाला. नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीदरम्यान काँग्रेससह विरोधी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी सभागृहात आपल्या जागेवर उभे राहून संविधानाच्या प्रती हातात घेऊन निषेध नोंदविला. तसेच विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. मोदी शपथ घेण्यासाठी येताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आपल्या जागेवर उभे राहून हातातील संविधानाच्या प्रती झळकावत संविधान बचावच्या घोषणा दिल्या. याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शपथविधीवेळी इंडिया आघाडीच्या खासदारांनी निषेध नोंदविला.

संसदेचे कामकाज सुरू होताच हंगामी लोकसभा अध्यक्ष भतृहरी महताब यांनी पंतप्रधान मोदी यांना खासदारकीची शपथ दिली. त्यानंतर शपथविधीसाठी तालिका पीठावर नेमण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्या के. सुरेश यांचे नाव पुकारण्यात आले. मात्र, सुरेश सभागृहात उपस्थित नव्हते. हंगामी लोकसभा अध्यक्षांच्या मदतीला नेमण्यात आलेल्या पॅनलमधील द्रमूकचे खासदार टी. आर. बालू यांना शपथ घेण्यासाठी बोलाविले असता, ते सुद्धा सभागृहात हजर नव्हते.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षातील हे दोन्ही खासदार पहिल्या रांगेत बसले होते. मात्र, पंतप्रधान मोदी शपथ घेत असतानाच ते सभागृहातून बाहेर गेले. या दोघांच्या अनुपस्थितीनंतर पॅनलमधील भाजपचे खासदार राधा मोहन सिंह आणि खासदार फग्गनसिंह कुलस्ते यांनी खासदारकीची शपथ घेतली. विरोधी पक्षातील तृणमूल काँग्रेसचे खासदार सुंदीप बंदोपाध्याय हे देखील सभागृहात गैरहजर होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेल्या राज्यमंत्र्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर इंग्रजी अक्षरांनुसार विविध राज्यांतील खासदारांना शपथ घेण्यासाठी पाचारण करण्यात आले.

सपा खासदार लाल टोपी, दुपट्टा घालून सभागृहात

संसदेत समाजवादी पक्षाच्या खासदारांनी एकत्र सभागृहात प्रवेश केला. सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपल यादव यांना मागे सोडून अयोध्येतून निवडून आलेले पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांचा हात धरून सभागृहात प्रवेश केला. सभागृहाच्या आत आणि बाहेर आपले वेगळेपण दाखवित सपाच्या खासदारांनी डोक्यावर लाल टोपी आणि गळ्यात लाल दुपट्टा घातली होती.

गडकरी, गोयलांची हिंदीतून तर बाकी मंत्र्यांची मराठीतून शपथ

महाराष्ट्रातील केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी हिंदीतून शपथ घेतली. राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे यांनी मराठीतून शपथ घेतली. गोव्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकूण २६२ खासदारांनी शपथ घेतली. महाराष्ट्रातील उर्वरित खासदार उद्या शपथ घेणार आहेत.

लोकसभा अध्यक्षपदासाठी आज नामांकन

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे. आतापर्यंत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी आपला उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे इंडिया आघाडी अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा करणार का? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

SCROLL FOR NEXT