Lokotsav 2025 Pudhari
राष्ट्रीय

Lokotsav 2025 | लोकसंस्कृतीच्या लोकोत्सवात लोक कुठे आहेत?

दिल्लीत महाराष्ट्र आणि ओडीशाच्या लोकसंस्कृतीचे सादरीकरण 

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

राजधानी दिल्लीत महाराष्ट्र राज्य शासनाच्या  अंतर्गत येणाऱ्या विविध घटकांच्या वतीने 'लोकसंस्कृतीचा लोकोत्सव' हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये महाराष्ट्र आणि ओडिशा राज्याच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. यासाठी दोन्ही राज्यातून अनेक कलाकार उपस्थित होते.

उत्तम सादरीकरण त्यांनी केले. मात्र लोकसंस्कृतीच्या लोकोत्सवात लोक कुठे आहेत, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती कार्यक्रमादरम्यान होती. राजधानी दिल्लीत महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन्ही राज्यातील कलाकारांनी अतिशय उत्तम कला सादर केली.

मराठी कलाकारांनी ढोल नृत्य प्रकार सादर केले तर ओडिशा राज्याच्या कलाकारांनी बाजासाला नृत्य प्रकार सादर केला. जी लोक उपस्थित होती त्यांनी चांगला प्रतिसादही दिला. मात्र सभागृह भरून असते तर कलाकारांनाही राष्ट्रीय राजधानीत आणखी बळ मिळाले असते. महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील २६ कलाकार कार्यक्रमाला  उपस्थित होते.

राजधानीत कला सादर करता येते याचा आनंद आहे मात्र लोकांची उपस्थिती जास्त असली तर कला सादर करायला प्रोत्साहन मिळते, अशा भावना काही कलाकारांनी बोलून दाखवल्या. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्र व महाराष्ट्र सदनाच्या संयुक्त विद्यमाने 'एक भारत श्रेष्ठ भारत' अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एरवी राजधानीत मराठी कार्यक्रमांना मोठी गर्दी असते. रविवारी तर हमखास गर्दी असते. दिल्लीत मराठी नागरिकही मोठ्या प्रमाणात राहतात. मात्र या कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती नगण्य होती. महाराष्ट्र सदनात ज्या सभागृहात कार्यक्रम होता त्या सभागृहात ५० टक्केही लोक उपस्थित नव्हते. त्यामुळे जर लोकच नसतील तर लोकसंस्कृतीच्या लोकोत्सवाचा घाट कोणासाठी हा प्रश्न उपस्थित होतो.

लोक का आले नाही किंवा आगामी कार्यक्रमात लोक अधिकाधिक आली पाहिजेत, यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्न करणार का, असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होतो. दरम्यान, या कार्यक्रमाचे निमंत्रण अनेकांनी केवळ एक दिवसापूर्वी व्हाट्सएपवर मिळाल्याचे सांगितले. आपल्या राज्याची संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासन विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते.

राज्य शासनाच्या वतीने दिल्लीतही विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. मोठा निधी यासाठी खर्च केला जातो. मात्र एवढे करून लोकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होती. दरम्यान, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा पूर्णवेळ उपस्थित होत्या. त्यांनी दोन्ही राज्याच्या कलाकारांचे स्वागत केले आणि कौतुकही केले. मात्र पत्रिकेत नाव असलेले इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. त्यांच्या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशनामुळे आणि इतर ठिकाणीही कार्यक्रम असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT