WhatsApp Screen Mirroring Fraud :
नवी दिल्ली : सध्या सायबर गुन्हेगार एका नव्या आणि अत्यंत धोकादायक पद्धतीचा वापर करून लोकांच्या बँक खात्यातून पैसे आणि त्यांची वैयक्तिक माहिती चोरत आहेत. 'व्हॉट्सॲप स्क्रीन मिररिंग फ्रॉड' (WhatsApp Screen Mirroring Fraud) नावाची अत्याधुनिक युक्ती वापरून फसवणुक केली जात आहे.
'वनकार्ड' (OneCard) या कंपनीने नुकताच आपल्या ग्राहकांना याबाबत इशारा दिला आहे. ही पद्धत अत्यंत धोकादायक आहे कारण याद्वारे सायबर गुन्हेगारांना तुमच्या फोनचा आणि त्यातील सर्व गोपनीय माहितीचा थेट ताबा मिळू शकतो. केवळ वनकार्डच नव्हे, तर इतरही अनेक सार्वजनिक आणि खासगी बँकांनी वेळोवेळी या घोटाळ्याबद्दल नागरिकांना सतर्क केलं आहे.
या फसवणुकीची सुरुवात एका फोन कॉलने होते. सायबर भामटा बँकेचा किंवा एखाद्या विश्वसनीय कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवून तुम्हाला फोन करतो. तुमच्या खात्यात काहीतरी मोठी अडचण निर्माण झाली आहे, असं सांगून तो तुम्हाला घाबरवून टाकतो. ही खोटी समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनची स्क्रीन त्यांच्यासोबत शेअर करावी लागेल, असे तो तुम्हाला पटवून देतो. ही समस्या सोडवण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असे भासवून तो तुमचा विश्वास मिळवतो.
यानंतर, हे भामटे तुम्हाला फोनवर स्क्रीन-शेअरिंग किंवा रिमोट ॲक्सेस सुरू करण्याच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करतात. सर्वकाही खरं वाटावं यासाठी, ते तुम्हाला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करण्यास सांगतात, जेणेकरून त्यांना तुमची स्क्रीन अधिक चांगल्या प्रकारे पाहता येईल. एकदा तुम्ही व्हिडिओ कॉलवर स्क्रीन शेअरिंग सुरू केलं की, तुम्ही तुमच्या फोनवर जे काही करता ते सर्व त्यांना रिअल-टाईममध्ये दिसतं. ते तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी तुमचं बँकिंग ॲप उघडायला सांगतात. ज्या क्षणी तुम्ही तुमचा पासवर्ड, पिन किंवा ओटीपी (OTP) टाकता, तो त्यांना दिसतो आणि ते तो चोरतात.
काही प्रकरणांमध्ये, फसवणूक करणारे तुम्हाला एक बनावट ॲप इन्स्टॉल करण्यास सांगतात, ज्यामध्ये 'की-लॉगर' नावाचं सॉफ्टवेअर असतं. हे सॉफ्टवेअर तुम्ही तुमच्या फोनवर जे काही टाईप करता, ते सर्व रेकॉर्ड करतं, ज्यात तुमच्या बँकिंग ॲप्स, सोशल मीडिया आणि इतर खात्यांचे पासवर्ड्ससुद्धा असतात. ही माहिती मिळताच ते तुमची खाती ताब्यात घेऊन त्यातील पैसे काढून घेऊ शकतात.
भारतातील बहुतांश बँकिंग ॲप्समध्ये अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी पुरेशी सुरक्षा प्रणाली आहे. 'इनेफू लॅब्स'चे सह-संस्थापक आणि सीईओ तरुण वीग यांनी 'इकॉनॉमिक टाइम्स'ला सांगितले, "भारतातील बहुतांश आघाडीच्या बँकिंग ॲप्समध्ये सुरक्षित स्क्रीन ओव्हरले, स्क्रीन कॅप्चर लॉकडाउन आणि सेशन टाइमआउट यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. परंतु या सुरक्षा उपायांची परिणामकारकता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लक्षणीयरीत्या भिन्न असू शकते."
बँकेतून बोलत असल्याचा दावा करणाऱ्या कॉलर्सची सत्यता तपासा.
केवळ अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच आणि फक्त विश्वासू व्यक्तींसोबतच स्क्रीन-शेअरिंगचा पर्याय वापरा.
तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असल्यास, 'अज्ञात स्त्रोतांकडून ॲप्स इन्स्टॉल करणे' ही सेटिंग बंद करा.
संशयास्पद नंबर्स तात्काळ ब्लॉक करा आणि त्यांची तक्रार cybercrime.gov.in वर करा किंवा 1930 या क्रमांकावर कॉल करा.