प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
राष्ट्रीय

वक्फ दुरुस्ती विधेयक काय आहे?

Waqf Amendment Bill | किरण रिजिजू यांनी लोकसभेत मांडले वक्फ दुरुस्ती विधेयक

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने बुधवारी संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केले, ज्याला विरोधकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले. सरकारने या विधेयकाचे वर्णन अल्पसंख्याक समुदायाच्या पारदर्शकता आणि सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल म्हणून केले आहे, तर विरोधी पक्ष ते संविधानाच्या विरोधात आणि धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला म्हणत आहेत. जाणून घ्या, वक्फ दुरुस्ती विधेयक नेमकं काय आहे?

देशात स्वातंत्र्यानंतर वक्फ कायदा लागू

देशात स्वातंत्र्यानंतर 1954 मध्ये वक्फ कायदा लागू झाला. वक्फ बोर्डाची देशात किमान 8 लाख एकरांहून अधिक जमीन व अंदाजे सव्वा लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ही जमीन जगातील 50 लहान देशांच्या क्षेत्रफळाइतकी आहे. वक्फ बोर्ड कायद्याच्या कलम 40 अंतर्गत वक्फ मंडळाला ‘रिझन टू बिलीव्ह’चा अधिकार प्राप्त होतो. एखादी मालमत्ता वक्फ संपत्ती आहे, असे या मंडळाला वाटत असेल, तर ते स्वतः ती वक्फ संपत्ती असल्याचे घोषित करू शकते. त्याबाबत वक्फ न्यायाधिकरणाकडे आक्षेप नोंदवणे व नंतर उच्च न्यायालयात आव्हान देणे, ही प्रक्रिया खूप गंतागुंतीची आहे. सध्या देशातील वक्फ मंडळांना मालमत्तांमधून 200 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळतो. गेल्या 75 वर्षांत या मंडळांकडे असलेल्या जमिनींची संख्या 35 हजारवरून आता सुमारे 10 लाख जमिनीच्या तुकड्यांवर जाऊन पोहोचली आहे. त्यातील अनेक जमिनी वक्फ मंडळांनी बळकावल्याचा दावा जेपीसीतील भाजप सदस्यांनी केला.

या विधेयकांची नावे काय? कधी मांडण्यात आली?

  • वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४

  • मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक, २०२४

८ ऑगस्ट २०२४ रोजी लोकसभेत दोन विधेयके सादर करण्यात आली. वक्फ सुधारणा विधेयक, २०२४ आणि मुस्लिम वक्फ रद्द विधेयक, २०२४. त्यांचा उद्देश वक्फ बोर्डाचे काम सुलभ करणे आणि वक्फ मालमत्तांचे कार्यक्षम व्यवस्थापन सुनिश्चित करणे आहे. वक्फ विधेयकाचा उद्देश वक्फ कायदा, १९९५ मध्ये सुधारणा करणे आहे. जेणेकरून वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात उद्भवणाऱ्या समस्या आणि आव्हाने सोडवता येतील. या दुरुस्ती विधेयकाचा उद्देश देशातील वक्फ मालमत्तांचे प्रशासन आणि व्यवस्थापन सुधारणे आहे.

या विधेयकाचा उद्देश आणि काय होणार प्रमुख बदल?

हे विधेयक वक्फ अधिनियम, १९९५ मध्ये सुधारणा करून वक्फ मालमत्तेच्या नियंत्रण आणि देखरेखीच्या संदर्भातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करते.

  • पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून वक्फ मंडळांचे कार्य अधिक सक्षम करणे.

  • वक्फशी संबंधित संज्ञा सुधारित करणे.

  • नोंदणी प्रक्रियेत सुधारणा करणे.

  • वक्फ रेकॉर्डच्या व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा अधिक वापर करणे.

विधेयकामुळे फायदा काय?

  • वक्फ मालमत्तेचे डिजिटायझेशन: केंद्रीकृत डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मालमत्तेचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल.

  • लेखा परीक्षण आणि हिशोब तपासणी: आर्थिक गैरव्यवस्थापन रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील.

  • वक्फ मालमत्तेच्या बेकायदेशीर ताब्याला आळा: महसूल वाढल्याने वक्फ मंडळांना आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण आणि उपजीविकेसाठी निधी वापरणे शक्य होईल.

  • नियमित लेखा परीक्षण आणि तपासणी: वित्तीय शिस्त राखण्यासाठी आणि जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT