लंडन : भोपाळचे अखेरचे नवाब हमिदुल्लाह खान, त्यांची पत्नी मैमुना सुलतान यांनी 1932 साली लंडनमध्ये त्यांच्या कन्या राबिया, आबिदा, साजिदा यांच्यासोबत फोटोसेशन केले. Pudhari File Photo
राष्ट्रीय

‘इनिमी प्रॉपर्टी’शी सैफ यांचे कनेक्शन काय

देशात 12 हजारांवर शत्रू मालमत्ता; 1 लाख कोटींवर मूल्य

पुढारी वृत्तसेवा

मध्यप्रदेशातील ‘इनिमी प्रॉपर्टी’ अर्थात शत्रू मालमत्तेवरील स्थगिती हटविण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला आहे. त्यामुळे ही संपत्ती सरकार जमा होण्याच्या मार्गावर आहे. अभिनेते सैफ अली खान आणि त्यांच्या मातोश्री शर्मिला टागोर या संपत्तीवर दावा करू शकतात. सैफ अली खान यांचे इनिमी प्रॉपर्टीशी कनेक्शन काय आणि देशातील ‘इनिमी प्रॉपर्टी’ची थोडक्यात माहिती जाणून घेऊ.

सैफ अली खान यांचे वडील मन्सूर अली खान ऊर्फ टायगर पतौडी यांच्या मातोश्री साजिदा यांना त्यांचे वडील आणि भोपाळचे अखेरचे नवाब हमीदुल्लाह खान यांच्याकडून मध्यप्रदेशातील प्रॉपर्टी मिळाली होती. या मालमत्तेचा बाजारभाव सध्या 15 हजार कोटींहून अधिक आहे. भारत सरकारनेच साजिदा यांना या संपत्तीचे वारस म्हणून जाहीर केले होते.

सैफ यांचे कनेक्शन

सैफ यांचे आजोब हमीदुल्लाह खान यांना राबिया सुलतान, अबिदा सुलतान आणि साजिदा या तीन मुली होत्या. भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर अबिदा या पाकिस्तानात स्थायिक झाल्या. त्यामुळे सैफ यांच्या आजी साजिदा यांच्या नावावर ही प्रॉपर्टी करण्यात आली होती. साजिदा यांचा विवाह इफ्तिखार अली खान यांच्यासोबत झाला होता.

2015 पासून केंद्राच्या ताब्यात

सैफ यांच्या घराण्याशी संबंधित या मालमत्तेची चौकशी केल्यानंतर केंद्र सरकारने 2015 साली ही संपत्ती ताब्यात घेतली होती. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने केंद्राच्या निर्णयास स्थगिती दिली होती.

सैफ यांच्या आजी वारस

1951 साली भारत सरकारने साजिदा खान यांना या संपत्तीचे वारस जाहीर केल्याचा मुद्दा नवाब घराण्याच्यावतीने बाजू मांडणार्‍या वकिलांनी न्यायालयात मांडला आहे. सैफ अली खान आणि त्यांच्या मातोश्री शर्मिला टागोर यांना या प्रॉपर्टीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे जाण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे.

‘इनिमी प्रॉपर्टी’ म्हणजे काय

1968 साली इनिमी प्रॉपर्टी अ‍ॅक्ट मंजूर करण्यात आला. एकादी व्यक्ती अथवा कंपनीच्या मालकाने युद्धकाळात अथवा संघर्षादरम्यान भारताच्या शत्रूराष्ट्राचे नागरिकत्व स्वीकारणार्‍यांच्या भारतातील संपत्तीला ‘इनिमी प्रॉपर्टी’ म्हणतात.

या प्रॉपर्टीवर नियंत्रण कुणाचे

1968 पासून ‘इनिमी प्रॉपर्टी’वर केंद्रीय गृहमंत्रालयाचे नियंत्रण प्रस्थापित झाले. देशभरात अशा 12 हजारांवर प्रॉपर्टीज आहेत. या सर्व ‘इनिमी प्रॉपर्टी’चे एकूण मुल्य 1 लाख कोटींहून अधिक आहे. अशा मालमत्तांची विक्री अथवा लिलाव करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली जाते. विक्रीतून मिळणारी रक्कम केंद्र सरकारच्या संचित निधीमध्य जमा करण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT