West Bengal Politics TMC: तृणमूल काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांची रविवारी बैठक बोलवली होती. या बैठकीचे अध्यक्षपद खुद्द ममता बॅनर्जी भूषवणार होत्या. ही बैठक कोलकाता येथील ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला निवडून आलेल्या ८० पैकी फक्त १९ आमदारांनीच हजेरी लावली.
चटोपाध्याय यांना विरोधी पक्षनेता म्हणून नोमिनेट केलेल्या पत्रातील काही स्वाक्षऱ्या खोट्या असल्याची सीआयडी चौकशी करण्यात येत आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. विरोधीपक्ष नेता म्हणून नियुक्त करण्यासाठी ८० पैकी किमान ३० आमदारांची पत्रावर स्वाक्षरी गरजेची असते.
याबाबत प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आणि कोलकातामधील बेलियाघाटा येथील आमदार कुणाल घोष यांनी सांगितलं की, या बैठकीला बहुतांश आमदार येऊ शकले नाहीत कारण ते अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी उतरले होते.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असून तृणमूल काँग्रेस उभ्या फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ८० पैकी तब्बल ६१ आमदारांची ममतांनी बोलवलेल्या बैठकीला दांडी मारण्याने बंगालमध्ये राजकारण वेगळ्या वळणावर चाललं आहे का अशी शक्यता वर्तवली जात आहे.
घोष म्हणाले, 'अनेक आमदारांनी नेतृत्वाला काल फोन करून ते आंदोलन करत आहेत त्यामुळं ते या बैठकीला येऊ शकणार नाहीत असं कळवलं होतं त्यांनी बैठक पुढे ढकलावी अशी मागणी देखील केली होती. काही लोकांनी आज देखील फोन केले आहेत. जे कोणी या बैठकीला आले त्यांच्यासोबत आम्ही थोडी चर्चा केली. त्यानंतर आता पुढची बैठक कधी होणार हे लवकरच जाहीर करण्यात येईल.'
घोष यांनी, 'आम्ही शनिवारी अभिषेक बॅनर्जी आणि रविवारी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधात उप विभागीय आणि कम्युनिटी ब्लॉक स्तरावर उद्या आंदोलन करणार आहोत. २ जून रोजी ममता बॅनर्जी देखील राणी रासमोनी रोडवर एका दिवसाचे आंदोलन करणार आहेत.' असे सांगितलं.