West Bengal gang rape
पश्चिम बंगाल: मित्रासोबत जेवायला गेलेल्या ओडिशातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर पश्चिम बंगालमधील पश्चिम बर्धमान (दुर्गापूर) जिल्ह्यामध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आहे. शुक्रवारी रात्री खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसराबाहेर ही घडना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे.
ओडिशाच्या जलेश्वर येथील रहिवासी असलेल्या या विद्यार्थिनीवर जवळच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पीडित विद्यार्थिनीच्या आई-वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीच्या मित्रांचा फोन आल्यानंतर ते शनिवारी सकाळी दुर्गापूरला पोहोचले. आईने आरोप केला की, शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजता त्यांची मुलगी तिच्या मित्रासोबत रात्रीच्या जेवणासाठी कॉलेज परिसरातून बाहेर गेली असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
विद्यार्थिनीचे वडील म्हणाले की, "आम्हाला तिच्या मित्रांचा फोन आला आणि आम्ही घटनेबद्दल ऐकले. आम्ही शनिवारी सकाळी येथे आलो आणि पोलिसात तक्रार दाखल केली. या कॉलेजची शैक्षणिक कामगिरी चांगली आहे असे मी ऐकले होते, त्यामुळे आम्ही आमच्या मुलीला येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी पाठवले होते."
दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेशी संबंधित अनेक लोकांची चौकशी सुरू केली आहे. पीडितेच्या मित्राची चौकशी केली जात आहे.