नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील एका १५ वर्षीय मुलाने नववीच्या सहामाही परीक्षेत चांगले गुण मिळवले. त्याच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी वडिलांनी त्याला तब्बल २.३० कोटी रुपये किमतीची BMW M4 Competition ही आलिशान कार भेट दिली. विशेष म्हणजे, एकेकाळी मुंबईत चित्रपटांसाठी लाइटमन म्हणून काम करणारे हे वडील आज कोट्यवधींची उलाढाल असलेले तांदळाचे मोठे व्यापारी आहेत. मात्र, १५ वर्षांच्या मुलाला सध्या ही कार स्वतः चालवता येणार नाही.
पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यातील गलसी परिसरातील पराज गावात शम्सुद्दीन मिद्या हे राहतात. त्यांचा मुलगा मोहम्मद तलहा गावातीलच शाळेत नववीच्या वर्गात शिकत आहे. तलहाला बऱ्याच काळापासून BMW M4 Competition ही कार हवी होती. त्याने अनेक दिवसांपूर्वीच वडिलांकडे BMW घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.
शम्सुद्दीन यांनी सांगितले की, मुलाने त्यांना यापूर्वीच, 'अब्बा, मला BMW हवी आहे,' असे म्हटले होते. सहामाही परीक्षेत त्याने चांगले गुण मिळवल्यानंतर त्याची ही इच्छा पूर्ण करण्याचे त्यांनी ठरवले. त्यानंतर ते मुंबईला गेले आणि अंधेरी येथील एका शोरूममधून नवी BMW M4 Competition खरेदी केली. शुक्रवारी ही आलिशान कार खास कंटेनरमधून पराज गावात आणण्यात आली. या कारची किंमत सुमारे २.३० कोटी रुपये असल्याचे शम्सुद्दीन यांनी सांगितले.
शम्सुद्दीन यांचा यशस्वी व्यावसायिक होण्यापर्यंतचा प्रवासही तितकाच रंजक आहे. आज ते तांदळाचे मोठे व्यापारी म्हणून ओळखले जात असले, तरी एकेकाळी ते मुंबईतील चित्रपटसृष्टीत लाइटमन म्हणून काम करत होते. २००३ मध्ये कामाच्या शोधात ते मुंबईत आले. सुमारे सात वर्षे मुंबईत राहिल्यानंतर २०१० मध्ये ते आपल्या गावी परतले. त्यानंतर त्यांनी तांदळाचा व्यवसाय सुरू केला. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी या व्यवसायाचा हळूहळू विस्तार केला. आज गलसी परिसरात त्यांच्या मालकीच्या तीन राइस मिल आहेत. त्यांचा व्यवसाय केवळ पश्चिम बंगालपुरता मर्यादित नसून व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर आणि दुबई यांसारख्या देशांमध्येही ते तांदळाची निर्यात करतात.
शम्सुद्दीन यांना महागड्या गाड्यांची विशेष आवड आहे. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये यापूर्वीच रेंज रोव्हर, व्होल्वो, महिंद्रा थार आणि ह्युंदाई अल्काझार यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. आता BMW M4 Competition या नव्या कारचीही त्यात भर पडली आहे. त्यांच्या गाड्यांच्या क्रमांकांमध्येही एक विशेष बाब आहे. त्यांच्या अनेक गाड्यांच्या नंबर प्लेटवरील नोंदणी क्रमांकाचे शेवटचे तीन आकडे '५५५' आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या गाड्यांशीही हा क्रमांक जोडला जातो. आपल्या यशाचे श्रेय शम्सुद्दीन यांनी परमेश्वराच्या कृपेला दिले आहे. 'हे सर्व काही त्याच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
वडिलांकडून मिळालेली ही महागडी भेट तलहासाठी एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखीच आहे. मात्र, सध्या त्याला ही कार स्वतः चालवता येणार नाही. कारण त्याचे वय अवघे १५ वर्षे असून, त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नाही. तलहाने सध्या आपले संपूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आठवड्यातून एक दिवस या नव्या BMW मधून फेरफटका मारण्याचा त्याचा बेत आहे. त्या दिवशी वडील स्वतः कार चालवतील आणि तो शेजारच्या सीटवर बसून प्रवासाचा आनंद घेईल.