West Bengal Election Results  
राष्ट्रीय

West Bengal Election Results | घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करणार: प. बंगालच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची घोषणा

'भयमुक्त बंगाल ही मोदीची गॅरंटी, राजकीय हिंसाचाराचे चक्र थांबवणार'

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भाजप मुख्यालयातील जल्लोषात सहभागी होत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपच्या विजयासाठी मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत जनतेचे आभार मानले. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वातील पहिल्याच विधानसभा निवडणुकांमध्ये मोठी यश मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. पश्चिम बंगालमधील निकालाचे 'भाजपचा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय' असे वर्णन त्यांनी केले. 

पश्चिम बंगाल सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्यमान भारत योजनेला हिरवा झेंडा दाखवणार. तसेच घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. पश्चिम बंगालला भाजप भयमुक्त करत राजकीय हिंसाचाराचे चक्र थांबवेल, ते म्हणाले. या विजयामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल असे देखील ते म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला 'भारत माता की जय'चे नारे दिले. ते म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. अनेक वर्षांच्या तपस्येचे फळ भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळाले. याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आजचा दिवस अनेक अर्थानी विशेष आहे. हा देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या उद्घोषणेचा, विश्वासाचा दिवस आहे. या राज्यांमधील जनतेने विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कमाल करून कमळ फुलवत नवा इतिहास रचला, असे ते म्हणाले. 

नितीन नवीन यांचे कौतुक आणि स्वागत

भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळल्यानंतर पहिल्या विधानसभा निवडणुका होत्या. या निवडणुकीत पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचे मार्गदर्शन मिळाले. ते या विजयात साठी बहुमूल्य राहिले, असे म्हणत त्यांनी नितीन नवीन यांचे कौतुक केले. तसेच मंचावर येताच सुरुवातील नितीन नवीन यांच्या गळ्यात पुष्पमाला टाकत त्यांचे स्वागत केले. 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन

पंतप्रधान मोदी म्हणाले की, विविध पोटनिवडणुकांचे निकाल देखील उत्साह पूर्वक राहिले. महाराष्ट्र, गुजरात, नागालँड आणि त्रिपुरामध्ये एनडीएच्या उमेदवारांना जनतेने आशीर्वाद देत निवडून दिले. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि एनडीएच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी देखील मोठा विजय मिळाला. या सर्व राज्यातील जनतेचा आभार मोदी यांनी मानले. 

"भारताला 'मदर ऑफ डेमोक्रेसी' म्हणून का ओळखले जाते, हे जनतेने दाखवून दिले"

ते म्हणाले की, विजय पराभव हा लोकशाहीच्या भाग आहे. मात्र पाच राज्यातील जनतेने पूर्ण जगाला दाखवून दिले आहे की, आमचा भारत 'मदर ऑफ डेमोक्रसी' म्हणून का ओळखला जातो. आज केवळ लोकशाही नाही तर भारताचे संविधान देखील जिंकले आहे. आमच्या संविधानिक संस्था जिंकल्या, लोकशाही प्रक्रिया जिंकली. या राज्यांमधील ऐतिहासिक मतदानासाठी आणि निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगासह त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. भारताच्या लोकशाहीच्या मान राखल्याबद्दल तुमच्या सर्वांचे योगदान इतिहास लक्षात ठेवेल, असे ते निवडणूक अधिकाऱ्यानं उद्देशून म्हणाले. 

'गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुलले'

मागच्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आले होते. तेव्हा मी भाजप मुख्यालयातून म्हटले होते गंगा बिहारमधून वाहत पुढे गंगासागरपर्यंत जाते. आज बंगालच्या विजयासह गंगोत्रीपासून गंगासागर पर्यंत कमळ फुलले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि आता पश्चिम बंगाल गंगेच्या काठावर वसलेल्या या राज्यांमध्ये भाजप एनडीएचे सरकार आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, गंगा मातेचा आशीर्वाद निरंतरपणे माझ्यासोबत आणि आमच्या सोबत आहेत. कामाख्या देवीचा आशीर्वाद राहिलेला आहे. आसामच्या जनतेने सलग तिसऱ्यांदा भाजप-एनडीए आघाडीवर विश्वास ठेवला. आसामच्या इतिहासातील ही खूप मोठी घटना आहे. पुद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवला.  

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा सलग विजय

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'नागरिक देव भवः' हा आमचा मंत्र आहे. जनतेच्या सेवेमध्ये आम्ही कायम आहोत. यामुळे जनता भाजपवर जास्तीत जास्त विश्वास करते. जिथे भाजप तिथे गुड गव्हर्नन्स आणि विकास हे समीकरण झाले आहे. यामुळे मागच्या दोन वर्षातील ट्रेंड बघा. हरियाणामध्ये सलग तिसऱ्यावेळा, महाराष्ट्रात जोरदार विजय, दिल्लीमध्ये अभूतपूर्व विजय, बिहारमध्ये पहिल्यापेक्षा मोठा विजय आम्हाला मिळाला. स्थानिक निवडणुकांमध्ये देखील भाजपाला मोठा विजय मिळाला, असे ते म्हणाले. 

'डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांच्या आत्म्याला शांती मिळाली'

पंतप्रधान मोदी म्हणाले की, डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांच्या आत्म्याला आज किती शांती मिळाली असेल ही गोष्ट भाजप कार्यकर्ता म्हणून माझ्या पुन्हा पुन्हा मनात येत आहे. त्यांनी 1951 मध्ये जनसंघाची स्थापना करून प्रत्येक कार्यकर्त्याला संदेश दिला होता, देशासाठी जगायचे आणि देशासाठी मरायचे. पश्चिम बंगाल भारताचा भाग म्हणून कायम ठेवण्यासाठी मुखर्जी यांनी मोठी लढाई लढली. त्यांनी समृद्ध बंगालचे स्वप्न बघितले होते ते स्वप्न काही दशकांपासून पूर्ण होण्याच्या प्रतीक्षा करत होते. आज बंगालच्या नागरिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ती संधी दिली. बंगालच्या राज्यात आजपासून एक नवा अध्याय जोडला गेला. आजपासून बंगाल भयमुक्त झाले. विकासाच्या विश्वासाने युक्त झाले. 

विजय बंगालच्या जनतेला समर्पित 

बंगालमध्ये आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्य या विजयासाठी समर्पित केले. भाजपाच्या अनेक महिला कार्यकर्त्यांना अनेक अत्याचार सहन करावे लागले. आपण कल्पना करू शकत नाही केरळ आणि बंगालमध्ये भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला किती अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्यावर किती अन्याय अत्याचार आणि जुलूम झाला. आज बंगालमध्ये भाजपच्या विजयाचे श्रेय अशा सर्व कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या परिवारांना देतो. हा विजय बंगालच्या जनतेला समर्पित करतो. 

बंगालच्या भविष्यासाठी भाजप दिवस-रात्र एक करणार

आजपासून बंगालच्या भविष्याची एक अशी यात्रा सुरू होत आहे जिथे विकास आणि नवीन अपेक्षा आता सोबत चालतील. आज प्रत्येक बंगालवासीयाला विश्वास देतो की बंगालच्या उज्वल भविष्यासाठी भाजप दिवस-रात्र एक करणार. बंगालमध्ये आता महिलांना सुरक्षा, युवकांना रोजगार मिळेल आणि स्थलांतर रोखणार असल्याचे ते म्हणाले.  

राजकीय हिंसाचार थांबवण्यासाठी राजकीय पक्षांना मोदींचे आवाहन 

बंगालमध्ये मागच्या दशकांमध्ये राजकीय हिंसाचारामुळे अनेक जणांचे आयुष्य उध्वस्त झाले. आजपासून राजकीय हिंसाचारामध्ये बदल झाला पाहिजे. यासाठी माझे सर्व राजकीय पक्षांना आवाहन आहे. भाजपा बदला नाही तर परिवर्तनाची गोष्ट करणार. सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना माझे आवाहन आहे हिंसाच्या या अंतहीन चक्राला नेहमीसाठी संपवूया.   

अंग, बंग आणि कलिंगमध्ये भाजपचे सरकार

अंग, बंग आणि कलिंग अशा सगळीकडे भाजपचे सरकार आले असल्याचे ते म्हणाले. अंग म्हणजे आजचे आसाम, बंग म्हणजे आजचे बंगाल आणि कलिंग म्हणजे ओडिशा आहे. विकसित भारतासाठी या सर्व राज्यात भाजपचे सरकार असणे गरजेचे होते, असे ते म्हणाले. 

जनतेने कम्युनिस्टांना सत्तेतून बाहेर काढले

पंतप्रधान मोदी म्हणाले, आज असे एकही राज्य नाही जिथे कम्युनिस्ट पक्ष सत्तेत आहे. हा केवळ राजकारणातील बदल नाही. हा विचारांमधील बदल आहे. विकसनशील भारताला कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे, हे यातून दिसून येते. आजच्या भारताला विकास, विश्वास आणि प्रगती हवी आहे. त्याला असे राजकारण हवे आहे जे देशाला पुढे नेईल. पण दुर्दैवाने, काँग्रेस पक्ष विरुद्ध दिशेने गेला. 

'महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना धडा मिळाला'

पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिला शक्ती हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी महिला शक्तीची गती रोखण्याचा प्रयत्न केला. या महिला-विरोधी पक्षांनी महिला शक्ती दुरुस्ती विधेयक मंजूर होऊ दिले नाही. मी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या अशा पक्षांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकला त्यांच्याच भगिनी आणि मुलींनी शिक्षा दिली. केरळममधील डाव्यांच्या १० वर्षांच्या गैरकारभाराचा काँग्रेसला फायदा झाला, पण पुढच्या वेळी केरळमच्या भगिनी काँग्रेसलाही धडा शिकवतील, असे ते म्हणाले. समाजवादी पक्षालाही उत्तर प्रदेशातील महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे भाकीत त्यांनी केले. 

हे राहुल गांधींचे अपयश, इंडिया आघाडी पत्त्याप्रमाणे कोसळणार - नितीन नवीन

नितीन नवीन यांनी विजयासाठी जनतेचे आभार मानले. सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच विरोधी पक्षावर निशाणा साधला. या निवडणुकांमधील पराभव हे राहुल गांधी यांचे अपयश आहे. निकालानंतर इंडिया आघाडी पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळेल, असा दावा त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT