राष्ट्रीय

West Bengal Election 2026 : ‘पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत आल्यास मांसाहार बंद होईल’ : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

Bengal politics non veg ban controversy : ‘लोकांच्या खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येईल‘

पुढारी वृत्तसेवा

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुरुलिया येथील जाहीर सभेत भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. ‘‘जर पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली, तर राज्यातील जनतेला मांसाहार करण्यापासून रोखले जाईल आणि लोकांच्या खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येईल,’’ असा खळबळजनक दावा ममतादिदींनी यावेळी केला.

भाजपच्या धोरणांवर टीका

पुरुलियातील जनसमुदायाला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की, ‘‘राज्यातील महिलांना 'लक्ष्मी भंडार' योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळत आहे. मात्र, भाजप निवडणुकीच्या तोंडावर काही आर्थिक मदतीचे गाजर दाखवेल आणि निवडणुका संपताच ही सर्व मदत कायमची बंद करून टाकेल. याव्यतिरिक्त, त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरही संशय व्यक्त केला. बंगाल निवडणुकीपूर्वी एसआयआरच्या (SIR) माध्यमातून जवळपास १.२ कोटी मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत,’’ असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव न घेता टीका करताना मुख्यमंत्री म्हणाल्या की, ‘‘भाजपचे एक मोठे नेते सध्या टीएमसीच्या विरोधात 'आरोपपत्र' प्रसिद्ध करत आहेत. परंतु, खरी गरज त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याची आहे. गुजरातमध्ये झालेल्या दंगलींचा इतिहास सर्वांना माहीत आहे.’’

स्वतःवर झालेल्या हल्ल्याचा आणि शारीरिक दुखापतीचा उल्लेख करत त्या पुढे म्हणाल्या की, ‘‘काही लोक मी पट्टी बांधून फिरते म्हणून माझी थट्टा करतात, पण मी मृत्यूला मात देऊन परतले आहे. टीकाकारांनी माझे डॉक्टरांचे अहवाल तपासावेत. माझ्यावर हल्ला झाला होता, म्हणूनच मला प्लास्टर बांधून व्हीलचेअरवरून प्रचार करावा लागला होता.’’

निवडणूक जिंकण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी आता आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून, भाजपच्या आव्हानाला त्या कशा प्रकारे सामोरे जातात आणि जनता कोणावर विश्वास दाखवते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT